माेबाईल बिघडल्यास घरातूनच केली जाते किरकाेळ दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:06+5:302021-06-09T04:39:06+5:30
अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे बहुतांश दुकाने बंद असली तरीही ऑनलाईन कामे सुरूच आहेत. या कामांसाठी ...
अरुण आडिवरेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे बहुतांश दुकाने बंद असली तरीही ऑनलाईन कामे सुरूच आहेत. या कामांसाठी माेबाईल गरजेचाच आहे. पण, दुकाने बंद असल्याने माेबाईल बिघडला, चार्जर बंद पडला, सिमकार्ड बंद पडले, डिस्प्ले गेला; मग करणार काय, असा प्रश्न माेबाईल ग्राहकांना पडला आहे. अडचणीत असलेल्या ग्राहकांना घरीच सेवा देऊन त्यांची गैरसाेय दूर करण्यात येत आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील मृत्युदर राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त असल्याने जिल्हा ‘रेड झाेन’मध्ये आहे. त्यामुळे अद्यापही निर्बंध शिथिल झालेले नाहीत. लाॅकडाऊनमुळे सर्वकाही बंद असले तरी अनेकांचे ऑनलाईन कामकाज सुरू आहे. मुलांच्या शिकवण्या, बँकेचे व्यवहार, विविध प्रशिक्षण, सेमिनार, याेगा क्लास यांसारख्या अनेक प्रकारांसाठी माेबाईलचा वापर केला जात आहे. विरंगुळा म्हणूनही अनेकजण माेबाईलवर वेबसीरिज बघत आहेत, तर काहीजण गेम्ससाठीही वापर करीत आहेत.
माेबाईलचा वापर वाढल्याने ते बिघडण्याचेही प्रमाण वाढले आहे. काेणाचा डिस्प्ले गेला, तर काेणाचा चार्जर खराब झाला, काेणाचे सिमकार्डच बंद पडले तर मग पुढे काय, असा प्रश्न पडताेच. नागरिकांची ही गैरसाेय पाहून त्यांना घरीच सेवा देऊन दिलासा देण्यात येत आहे. मात्र, माेबाईल दुरुस्ती बंदच आहे.
ऐन हंगामातच नुकसानाचा फटका
एप्रिल, मे आणि जूनच्या १५ तारखेपर्यंत माेबाईलच्या खरेदीचा हंगाम असताे. या कालावधीत गुरखे, खलाशी माेठ्या प्रमाणात येत असल्याने ते माेबाईलची खरेदी करतात. पावसाळ्यात माेबाईल खरेदीसाठी काेणी बाहेर येत नाही. त्यामुळे आता शिथिलता दिली तरी व्यावसायिकांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही.
अडीच महिन्यांपासून दुकान बंदच
एप्रिल महिन्यापासूनच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दुकाने बंद असली तरी दुकान भाडे, वीज बिल हे काही थांबलेले नाही. दुकानेच बंद असल्याने काेणतीच उलाढाल हाेत नाही. स्वत:चे गाळे असलेल्या दुकानदारांसमाेर कामगारांचा प्रश्न आहेच. त्याचबराेबर अन्य खर्च भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जीसएटी, हप्ते आहेतच...
लाॅकडाऊनच्या कालावधीत मेडिकल व कृषीविषयक दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे; पण माेबाईलची दुकाने गेल्या अडीच महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान साेसावे लागत आहे. दुकाने बंद असली तरी जीएसटी भरण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. बँकांनीही हप्ते भरण्यासाठी सवलत दिलेली नसल्याने व्यावसायिकांचे कंबरडेच माेडले आहे.
लाॅकडाऊनमुळे दुकाने बंदच आहेत. काम, धंदे नसल्याने लाेक नवीन माेबाईल खरेदी करू शकत नाहीत. अशा वेळी माेबाईलचे किरकाेळ काम असेल तर घरातून करून दिले जाते.
- महेंद्र बाेरकर, शाॅपी चालक
माेबाईल दुरुस्ती पूर्णपणे बंद आहे. ओळखीच्या काेणाला माेबाईल हवा असल्यास ताे उपलब्ध करून दिला जाताे. व्हाॅटस्ॲपवरून माेबाईल निश्चित करायला सांगताे. नंतर एका पिशवीत टाकून ताे दिला जाताे.
- कैलास चव्हाण, शाॅपीचालक