मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:31 AM2021-07-31T04:31:39+5:302021-07-31T04:31:39+5:30
रत्नागिरी : समुद्राच्या उधाणाने मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. पंधरामाड येथील भागाला लाटांमुळे मोठे भगदाड पडले ...
रत्नागिरी : समुद्राच्या उधाणाने मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. पंधरामाड येथील भागाला लाटांमुळे मोठे भगदाड पडले आहे. बंधाऱ्याबरोबर रस्ता वाहून गेला आहे. बंधाऱ्यालगत असणाऱ्या पेजे यांच्या घरात समुद्राचे पाणी घुसण्याची भीती आहे. यामुळे येथील सर्व रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. प्रशासनाने वाहून गेलेल्या बंधाऱ्याचे तत्काळ काम करून आमचे संरक्षण करावे, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
काही दिवसांपूर्वीच पांढरा समुद्र येथील रेतीचा काही भाग वाहून गेला होता. त्यामुळे समुद्राचा प्रवाह बदलून पुन्हा पांढऱ्या समुद्राकडे येण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, सोमवारी उधाणाच्या भरतीने मिऱ्याचा धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पंधरामाड, भाटीमिऱ्या, आलावा, भागात समुद्राच्या उधाणामुळे सात ठिकाणी बंधाऱ्याला धोका निर्माण झाला होता. सुमारे ९४ कोटीचे हे काम होते. मात्र, त्याला अपेक्षित निधी उपलब्ध झाला नाही. फक्त बंधाऱ्याची मलमपट्टी करण्यात आली. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सुमारे साडेतीन किलोमीटरचा १९० कोटीचा मिऱ्या बंधारा मंजूर आहे. परंतु त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी काही वर्षे जाणार आहेत. काम पूर्ण होईल तेव्हा होईल तोवर प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.