दोन्ही संघटनांकडून दिशाभूल

By admin | Published: February 18, 2016 12:22 AM2016-02-18T00:22:19+5:302016-02-18T21:14:31+5:30

संजय पडते यांचा आरोप : कामगार आणि इंटक संघटनेच्या कामकाजाबाबत आक्षेप

Misleading by both organizations | दोन्ही संघटनांकडून दिशाभूल

दोन्ही संघटनांकडून दिशाभूल

Next

कणकवली : एस. टी. कामगार संघटना तसेच इंटकच्या नेत्यांमध्ये सध्या कलगीतुरा सुरु आहे. संप करून इंटकने एस. टी. कामगारांची फसवणूकच केली आहे. तर कामगार संघटनेचे नेते आपल्या संघटनेचे ५० टक्के कामगार सभासद असल्याचे सांगत असतील तर मग अलीकडेच झालेला संप का यशस्वी झाला? याचे त्यांनी उत्तर द्यावे. विविध आश्वासने देऊन दोन्ही संघटना एस. टी. कामगारांची एकप्रकारे दिशाभूलच करीत आहेत, अशी टीका महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय पड़ते व कार्याध्यक्ष अनुप नाईक यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, महिला आघाडीप्रमुख स्नेहा तेंडोलकर, तालुकाप्रमुख सचिन सावंत, कामगार सेनेचे विभागीय सचिव संतोष गावडे, उपाध्यक्ष प्रकाश साखरे आदी उपस्थित होते.
यावेळी संजय पड़ते म्हणाले, अलीकडेच इंटकने केलेला संप हा एस. टी. कामगारांची दिशाभूल करणारा होता. गेली पंधरा वर्षे काँग्रेसची सत्ता असताना कामगारांचे प्रश्न त्यांनी का सोडवले नाही? याचे उत्तर त्यांनी कामगारांना द्यावे. या संपात आमची संघटना सहभागी झाली नव्हती. एस. टी. कामगारांना १९९८ साली बोनस मिळाला होता.
त्यानंतर मात्र बोनस मिळाला नव्हता. त्यानंतर युती शासनाच्या काळात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना बोनस दिला आहे. तसेच ३५२ कोटी थकीत रक्कम ही एस. टी. महामंडळाला दिली आहे. कामगार विम्याच्या रकमेत ही वाढ करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना, अद्ययावत १०० बेडचे हॉस्पिटल उभारून कामगारांना मोफत उपचार अशा विविध योजना सत्ता आल्यानंतर एक वर्षाच्या आत सुरु केल्या आहेत.
एस. टी. कामगारांवरील प्रलंबित खटल्याची सुनावणी तीन महिन्यात घेऊन निर्णय देण्याचे आदेश परिवहन मंत्र्यानी दिले आहेत. तसेच नवीन कामगार कराराच्या माध्यमातून एस. टी. कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न आमच्याकडून निश्चितच करण्यात येईल.
भविष्यात एस. टी. फायद्यात येण्यासाठी चांगल्या गाड्या खरेदी करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचे प्रयत्न राहणार आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार एस. टी. कामगारांच्या वेतनात वाढ करावी तसेच तशी तरतूद नवीन करारात करावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. असे सांगतानाच संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडविल्या जातील.
२५ फेब्रुवारी रोजी ओरोस येथे बसस्थानकाचे भूमिपूजन तसेच दोडामार्ग बसस्थानकाचे उद्घाटन परिवहन मंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असेही पडते यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)


५00 सदस्य नोंदणी : कामगारांना त्रास दिल्यास सहन करणार नाही
एस. टी. कामगार संघटना आपले पन्नास टक्के कामगार सदस्य असल्याचे सांगत आहे. असे जर असेल तर संपाच्या दिवशी वाहतूक व्यवस्था का कोलमडली? याचे त्यांनी उत्तर द्यावे. संप करण्याचा अधिकार मान्यताप्राप्त संघटनेला नसताना ते जर संपात सहभागी झाले असतील तर त्यांच्यावर कारवाई का नाही? असे प्रश्न उपस्थित करतानाच आमच्या संघटनेचे ५०० सदस्य झाले असून, कामगारांना जाणूनबुजून अधिकाऱ्यांनी त्रास दिला तर ते सहन केले जाणार नाही, असे पडते यांनी यावेळी सांगितले.


एस टी कामगार सेनेची विभागीय कार्यकारिणी जाहीर
महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेची सिंधुदुर्ग विभागीय कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यामध्ये कार्याध्यक्ष अनुप नाईक, विभागीय सचिव संतोष गावडे, उपाध्यक्ष एस. एन. राणे, प्रकाश साखरे, सहसचिव अजित शेट्ये, संघटक सचिव सी. वाय. गावडे, सल्लागार नाना नाडकर्णी, संतोष चव्हाण, खजिनदार विक्रम राणे, प्रसिध्दी सचिव महेश वेंगुर्लेकर, सदस्य रमाकांत जाधव, अरुण कदम, गिरीश परुळेकर, संजय जामसंडेकर, ए. बी. कुडतरकर, नितीन खानोलकर, चंद्रकांत चव्हाण यांचा समावेश आहे.

Web Title: Misleading by both organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.