परिवहन विभागाने राबवले ‘मिशन ऑक्सिजन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:30 AM2021-05-15T04:30:12+5:302021-05-15T04:30:12+5:30
सागर पाटील / टेंभ्ये : राज्यात कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या काळामध्ये रुग्णालयात दाखल झालेल्या ...
सागर पाटील / टेंभ्ये :
राज्यात कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या काळामध्ये रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांसाठी प्राणवायू मिळणे फार महत्त्वाचे बनले. या काळामध्ये राज्यातील परिवहन विभागाने शासनाच्या आदेशानुसार ‘मिशन ऑक्सिजन’ हा उपक्रम राबविला.
राज्यातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी परिवहन विभागावर सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पेलून हाॅस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत हाेण्यासाठी मदत झाली आहे़
ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने सर्व टँकर ताब्यात घेण्याचे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले. परिवहन विभागाने राज्यातील ऑक्सिजनची वाहतूक करणारे टँकर प्लांटमधून तसेच खासगी मालकांकडून आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेतले. त्यानंतरही टँकर कमी पडू लागल्याने नायट्रोजन आणि ऑरगॉनची वाहतूक करणारे टँकर वापरण्याचे आदेश दिले. शासनस्तरावर संबंधित कंपन्यांशी चर्चा झाल्यानंतर हे टँकर परिवहन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. परिवहन विभागातील मोटार वाहन निरिक्षकांना एक टँकर नेमून देण्यात आला़ त्यानंतर आवश्यक तांत्रिक बदल करून तो टँकर ऑक्सिजन वाहण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी त्या निरीक्षकावर देण्यात आली.
राज्यात ऑक्सिजनची वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहनांचा ताळमेळ बसावा, कुठले वाहन कुठे आहे, वेळेमध्ये पोहोचले की नाही, ऑक्सिजन प्लांटमधून निघाले की नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली. जीपीएस बसवण्याचे काम मोटार वाहन निरीक्षकांकडे देण्यात आले. या सगळ्या वाहनांचा कंट्रोल रूम परिवहन आयुक्त कार्यालयात ठेवण्यात आला. तेथे परिवहन आयुक्त कार्यालय, ठाणे, मुंबई, वाशी येथील अधिकाऱ्यांची २४ तास ड्युटी लावण्यात आली आहे़
प्रत्येक ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, एफडीए, महसूल, पाेलीस विभागामधून एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्या प्लांटमधील सगळ्या वाहतुकीचे नियोजन करणे, अडचणी सोडवणे अशी जबाबदारी या अधिकाऱ्यांवर देण्यात आली. त्यामुळे जबाबदारी निश्चित करणे अधिक सोपे झाले आहे़
--------------------------------
रेल्वेच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागांत ऑक्सिजन पोहोचविण्यात आले. काही दिवसांनी राज्यात ऑक्सिजनची अधिक गरज भासू लागल्याने एअर फोर्सच्या कार्गो विमानाने ऑक्सिजन टँकरची वाहतूक करण्यात येऊ लागली. विमानात बसू शकतील असे टँकर शोधून ते मुंबई विमानतळावर पोहोचवणे, त्यांचे आणि त्यांच्या चालकांचे पास बनवणे आणि ते तेथील कार्गो पायलट ऑफिसरच्या ताब्यात देणे, अशी जबाबदारी परिवहन विभागातील ठरावीक मोटार वाहन निरीक्षकांवर देण्यात आली.
-------------------------
जिल्ह्यात चार टँकरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. हे टँकर ऑक्सिजन प्लांटमधून निघाल्यापासून नियोजित ठिकाणी पोहाेचेपर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नियंत्रण असते. वाहतुकीच्या दरम्यान कोणतीही समस्या निर्माण झाल्यास या कार्यालयातर्फे तत्काळ आवश्यक सेवा पुरावली जाते. जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सदैव प्रयत्नशील आहे.
- सुबोध मेडशीकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी.