लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी ‘मित्रमेळा’चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:30 AM2021-05-14T04:30:59+5:302021-05-14T04:30:59+5:30
राजापूर : लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन राजापुरातील मित्रमेळाने राजापूर ग्रामीण रुग्णालयाला सहकार्याचा हात देत लसीकरणासाठी आलेल्या ...
राजापूर :
लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन राजापुरातील मित्रमेळाने राजापूर ग्रामीण रुग्णालयाला सहकार्याचा हात देत लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या नोंदणीसाठी मदत करण्याचे काम हाती घेतले आहे.
ग्रामीण रुग्णालयामध्ये सोमवारी दुपारनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस उपलब्ध करण्यात आली. या लसीकरणासाठी मोठी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला हाेता. त्यामुळे अनेक नागरिकांना लस उपलब्ध असूनही नोंदणीची वेळ संपल्याने लस न घेताच घरी परतावे लागले. अशातच मंगळवारी दुपारनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण दुपारनंतर असतानाही ११ वाजल्यापासून नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात नंबर लावण्यासाठी रांग लावली.
त्यामुळे गर्दी होऊन गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजापूरमधील मित्रमेळा ग्रुपने ग्रामीण रुग्णालयात संपर्क केला़ त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका मेस्त्री, निकेत कुडाळी व कोकणे यांच्याशी संपर्क केला़ व ग्रामीण रुग्णालय व मित्रमेळा राजापूर या दोघांच्या समन्वयाने गुरुवारी लसीकरण सुसूत्र पद्धतीने व गडबड, गोंधळ न होता पार पाडले. यावेळी मित्रमेळाचे ॲड. सुशांत पवार, मंदार पेणकर, सूरज पेडणेकर, अनंत रानडे, नीलेश खानविलकर व अध्यक्ष विवेक गुणे यांनी व्यवस्था पार पाडली़