मिऱ्या बंधाऱ्याला उधाणाचा फटका
By admin | Published: July 13, 2014 12:20 AM2014-07-13T00:20:39+5:302014-07-13T00:21:41+5:30
जोरदार लाटा : दगड सरकू लागल्याने धोका
रत्नागिरी : पौर्णिमेच्या उधाणाच्या भरतीचा तडाखा मिऱ्या बंधाऱ्याला बसला आहे. बंधाऱ्याच्या कामात केलेली अफरातफर जोरदार लाटांनी उघड केली असून बंधाऱ्याचे दगड मोठ्या प्रमाणात ढासळले आहेत. अनेक ठिकाणी दगडांमध्ये मोठमोठ्या फटी पडल्या आहेत.
समुद्राच्या अतिक्रमणापासून मिऱ्यावासियांचे संरक्षण व्हावे, यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा गेली दोन वर्षे उभारला जात होता. मात्र या कामात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार स्थानिकांनी वारंवार संबंधित विभागाकडे केली होती. अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष मिऱ्यावासियांच्या जीवावर बेतणार असल्याचे दृश्य या बंधाऱ्याची पाहणी करता दिसून येत आहे.
पावसाळ्यातील भरतीच्यावेळी येथील समुद्राच्या लाटा संरक्षक बंधारा ओलांडून गावात घुसत असतात. या लाटांची गती कमी व्हावी, या हेतूने धूप प्रतिबंधक बंधारा उभारला जाणे गरजेचे असते. मात्र मुरुगवाडा पंधरामाडपासून जाकिमिऱ्या उपळेकर बागेपर्यंत हा संरक्षक बंधारा उभारताना ठेकेदाराने पाच किलोपासून ५ टनापर्यंतचे दगड वापरले आहेत.
बंधाऱ्याच्या बाहेरील बाजूला मोठमोठे टनावारी दगड रचत असताना पोटात मात्र बारीक ५ ते १५ किलो वजनाचे दगड ओतून ठेवले. वादळी वाऱ्यासोबतच वेगवान लाटांचा तडाखा बसताच आतील दगड हलले. याचा परिणाम मोठ्या दगडांवर होवून ते ढासळू लागले आहे. त्यामुळे हा बंधारा गावाचे राहोच, पण स्वत:चे तरी रक्षण करेल का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)