राज्यात भाजपचा उन्माद, आमदार भास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:30 PM2022-03-14T18:30:30+5:302022-03-14T18:30:57+5:30
१२ आमदारांचे निलंबन केले. मी सभागृहात नसताना बारा आमदार आले. यावेळी मी असतो तर काहीही करून त्यांना सभागृहात येऊ दिले नसते. न्याय यंत्रणापेक्षाही विधिमंडळ मोठे आहे, हे ठणकावून सांगण्याचं काम सभागृहांमध्ये केले असते.
गुहागर : राज्यात भाजपचा उन्माद सुरू आहे. भाजपला नोटीस दिली की, दुरुपयोग भाजपवर टीका केली तरी ईडी सीबीआय चौकशीचा ससेमिरा मराठी माणसाच्या पाठीमागे लावला जात आहे. हे रोखण्यासाठी गावागावातून पेटून उठले पाहिजे, असे परखड मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.
गुहागर शिवसेनेचा रविवारी मेळावा आयाेजित करण्यात आला हाेता. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या संधीचं सोनं या कार्य अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी भास्कर जाधव पुढे म्हणाले की, या प्रकाशन मंत्र्यांच्या हस्ते मुंबई करायचे होते. मात्र, केवळ भावनेपोटी मतदारांसमोर पहिल्यांदा त्याचे प्रकाशन झाले पाहिजे, अशी मागणी केली. या अहवालातील कामे पाहिलीत तर केवळ बापाच्या जीवावर नाही तर स्वतःच्या जीवावर हा अहवाल छापला आहे, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य, विरोधी पक्ष नेता ते अध्यक्ष असेपर्यंत २३ कोटींची कामे जिल्ह्यात केली आहेत. २१०७ साली जी संधी मला दिली त्याचा मी सोने केले ते विकास कामरूपी या अहवालातून ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पांडुरंग कापले, नेत्रा ठाकूर, अण्णा कदम, पूजा चव्हाण, अरविंद चव्हाण, विनोद झगडे, महेश नाटेकर, सुवर्णा भास्कर ,राजू महाडिक, रोहन बने, विनायक मुळे, पूर्वी निमूणकर, विलास वाघे, सीताराम ठोंबरे उपस्थित होते.
आमदारांना येऊच दिले नसते
१२ आमदारांचे निलंबन केले. मी सभागृहात नसताना बारा आमदार आले. यावेळी मी असतो तर काहीही करून त्यांना सभागृहात येऊ दिले नसते. न्याय यंत्रणापेक्षाही विधिमंडळ मोठे आहे, हे ठणकावून सांगण्याचं काम सभागृहांमध्ये केले असते.
जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर काहीजणांच्या डोक्यात हवा जाते. कर्तृत्व शून्य पण मीच पुढचा आमदार अशा आविर्भावात असतो. त्यांच्या संधीचं सोनं नाहीतर मातीच मिळेल. यातूनच संघटनेत दुफळी निर्माण होते अशा शब्दात नाव न घेता याआधीच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कामगिरीवर जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी टोला लगावला.