कट्टर राजकीय स्पर्धक!, मराठा समाजाच्या मोर्चात भास्कर जाधवांनी रमेश कदमांना मारली मिठी
By संदीप बांद्रे | Published: September 4, 2023 06:30 PM2023-09-04T18:30:30+5:302023-09-04T18:44:03+5:30
चिपळूणात निघालेल्या मराठा मोर्चाने मात्र एकीचे शुभसंकेत दिले अशी चर्चा
चिपळूण : येथील मराठा समाजाच्या मोर्चात अनेक पक्षाचे नेते एकत्र आले होते. पण एकमेकाचे कट्टर राजकीय स्पर्धक असलेले आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम नुसते एकत्रच आले नाहीत, तर जाधवांनी चक्क रमेश कदमांना कडकडून मिठी देखील मारली, ही गळाभेट मोर्चात लक्षवेधी ठरली. उपस्थितांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत या दोन्ही नेत्यांच्या मिठीचे जोरदार स्वागत देखील केले.
चिपळूणमध्ये मराठा समाजाने निषेध मोर्चाचे सोमवारी सकाळी आयोजन केले होते. या मोर्चात मराठा समाजाचे नेते तसेच राजकीय नेते देखील सामील झाले होते. आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांचा सहभाग देखील अग्रभागी होता. आमदार शेखर निकम यांच्या गळ्यात हात टाकून भास्कर जाधव यांनी घोषणा दिल्या. तर दुसऱ्याच बाजूला उभे असलेले रमेश कदम यांना चक्क गळे मिठी मारून एक मराठा-लाख मराठा आशा जोरदार घोषणा दिली. हे दृश्य पाहून उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.
एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका करण्याची एक ही संधी न सोडणाऱ्या या नेत्यांचे समर्थक देखील काही वेळा एकमेकांना भिडले. त्यातून हाणामाऱ्या, राडे असे प्रकार देखील घडले. त्यामुळे जाधव - कदम राजकीय वैर टोकाला पोहचले. मात्र आज, सोमवारी चिपळूणात निघालेल्या मराठा मोर्चाने मात्र एकीचे शुभसंकेत दिले अशी चर्चा सुरू झाली आहे.