'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
By संदीप बांद्रे | Published: June 9, 2024 05:38 PM2024-06-09T17:38:17+5:302024-06-09T17:40:34+5:30
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सर्व प्रथम प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
चिपळूण : लोकसभा निवडणूकीत पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पूर्ण करून अपेक्षित यश मिळवून दिल्यानंतर "मातोश्री"चा आमदार भास्करराव जाधव यांच्यावरील विश्वास अधिक वाढला असून त्यांना पक्षाने आता पुन्हा त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. पूर्व विदर्भ तसेच सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या विभागीय नेते पदी आमदार भास्कर जाधव यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सर्व प्रथम प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. काही काळानंतर त्यांना पक्षाचे उप नेते पद देण्यात आले. या पदावर देखील त्यांनी उत्तम काम केले. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांचा आमदार जाधवावरील विश्वास वाढला. विधानसभा सभागृहातील कामकाजात लक्ष घालत जाधव यांनी सभागृह अक्षरशः गाजवले. विधानसभेच्या अध्यक्ष पदावर तर त्यांनी ऐतिहासिक असे काम करून दाखवले होते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार जाधव पूर्ण ताकदीने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले. होऊदे चर्चा, जन संवाद अशा पक्षीय कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण राज्यात पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. त्याची दखल घेत पक्षाने त्यांना थेट शिवसेना नेते पदाची जबादारी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी देण्यात आली होती.
पूर्व विदर्भात देखील त्यांनी पूर्ण ताकदीने काम केले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत असे यश मिळवून दिले. त्यामुळे आमदार जाधव यांच्यावर दिलेली जबाबदारी ते ताकदीने व प्रामाणिकपणे पूर्ण करतात असा पक्षप्रमुखांचा अधिक विश्वास संपादन करण्यात जाधव यशस्वी झाल्याचे आता स्पष्टपणे समोर येत आहे. त्यामुळेच आता त्यांच्याकडे पूर्व विदर्भासह सातारा,सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचे विभागीय नेते पद देण्यात आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या मुखपत्रातून तसे जाहीर करण्यात आले आहे.