रमेशराव तुम्ही चिपळूणची हंडी फोडा, मी तुम्हाला खांद्यावर घेतो; भास्कर जाधवांकडून एकीचे स्पष्ट संकेत
By संदीप बांद्रे | Published: September 8, 2023 03:27 PM2023-09-08T15:27:05+5:302023-09-08T15:28:18+5:30
चिपळूण : तुम्ही उत्तम कबड्डीपटू आहात, पकड कशी आणि कधी घालायची हे तुम्हाला चांगले ज्ञात आहे. तुम्ही मजबूत पकड ...
चिपळूण : तुम्ही उत्तम कबड्डीपटू आहात, पकड कशी आणि कधी घालायची हे तुम्हाला चांगले ज्ञात आहे. तुम्ही मजबूत पकड घाला, मी तुमच्या बरोबर उभा राहतो आणि हो रमेशराव आता चिपळूणची हंडी तुम्हीच फोडा. मी तुम्हाला खांद्यावर घेतो, अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार रमेश कदम बरोबर एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दिले. आता हे विधान नेमके कशासाठी होते, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत.
येथे गुरुवारी सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चिपळूणमध्ये देखील जल्लोषात दहीहंडी साजरी झाली. विशेषतः राजकीय पक्षाकडून शहरात बांधण्यात आलेल्या दहीहंड्या चांगल्याच गाजल्या आणि आकर्षणाचा विषय देखील ठरला होता. या दहीहंडी उत्सवात प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते एकमेकांना भेटत होते, काही ठिकाणी व्यासपीठ देखील गाजवत होते. परंतु येथे माजी आमदार रमेश कदम मित्र मंडळाने बांधलेली दहीहंडी वेगळ्याच कारणाने गाजली व त्याची मोठी चर्चा चिपळूणात सुरू झाली.
काही दिवसांपूर्वी चिपळूणात मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी रमेश कदम व भास्कर जाधव एकत्र आले होते. नुसते एकत्रच आले नाही तर आमदार जाधवांनी रमेश कदमांना मिठी मारत जोरदार घोषणा देखील दिल्या होत्या. अशातच रमेश कदम मित्र मंडळाकडून शहरात बांधण्यात आलेल्या दहीहंडीच्या व्यासपीठावर स्वतः आमदार जाधव पोहचले. रमेश कदमांना भेटले हितगुज झाली आणि थेट माईक हातात घेऊन आमदार जाधव आपल्या स्टाईलमध्ये व्यक्त झाले.
जाधव म्हणाले की, रमेशराव तुम्ही उत्तम कबड्डीपटू आहात. तुम्हाला पकड कशी आणि कधी घालायची हे माहीत आहे. आताही तुम्ही मजबूत पकड घाला, मी तुमच्या बरोबर उभा राहतो आणि हो रमेशराव आता चिपळूणची हंडी देखील तुम्हीच फोडा, मी तुम्हाला खांद्यावर घेतो. जाधवांच्या या वाक्याला उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली. टाळ्या शिट्ट्या आणि घोषणांनी परिसर दणाणले. जाधवांनी आपल्या खुमासदार भाषणाने खळबळ उडवून दिली. त्यांनी आपल्या भाषणातून एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दिलेच, परंतु त्याहीपेक्षा त्याचा राजकीय अर्थ काय, रमेश कदमांनी विधानसभा लढवावी, आपण त्यांना साथ देऊ की येणाऱ्या नगर परिषद निवडणुकांच्या दृष्टीकोनातून आमदार जाधवांचे ते विधान होते, याबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत.