आमदार पडळकर यांचे हेलिकॉप्टर भरकटले, सुमारे अर्धा तास आकाशातच घालत होते घिरट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 12:51 PM2023-10-18T12:51:36+5:302023-10-18T12:55:15+5:30
वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टर भरकटले
खेड ( जि. रत्नागिरी) : खराब हवामानामुळे धनगर आरक्षण जागर यात्रेनिमित्त खेड येथे सभेला येणारे आमदार गाेपीचंद पडळकर यांचे हेलिकाॅप्टर मंगळवारी भरकटले. सुमारे अर्धा तास हे हेलिकाॅप्टर आकाशात घिरट्या घालत हाेते. अखेर पावसाचा सामना करतच हे हेलिकाॅप्टर सायंकाळी ४:१५ वाजता भरणे नाका येथील हेलिपॅडवर उतरले.
धनगर आरक्षण जागर यात्रेनिमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर कोकण दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता भरणे येथे त्यांची सभा आयाेजित करण्यात आली हाेती. सिंधुदुर्गातील सभा संपवून ते हेलिकाॅप्टरने खेडकडे निघाले असता, सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि खेडमध्ये मुसळधार वादळी पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान अगदी खेडजवळ हेलिकॉप्टर पोहोचल्यानंतर वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टर भरकटले.
पावसाचा जोर कायम राहिल्याने भोस्ते घाटाच्या दरम्यान हेलिकॉप्टर बराच वेळ घिरट्या घालत राहिले. अखेर मुसळधार पावसाचा सामना करत हे हेलिकॉप्टर भरणे नाका येथील नियोजित हेलिपॅडवर सायंकाळी ४:१५ वाजता यशस्वीपणे उतरले. हा थरार वेरळच्या काही ग्रामस्थांनी डोळ्यादेखत पाहिला. पडळकर यांचे हेलिकाॅप्टर भरकटल्याने नियाेजित सभा उशिराने सुरू झाली.