आमदार किरण सामंत यांनी बदलला राजापूरचा मूड, सर्व पंचायत समिती गणात मिळवले मताधिक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 06:55 PM2024-11-28T18:55:47+5:302024-11-28T19:01:56+5:30
रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधामुळे उद्धवसेनेने नेहमीच चर्चेत ठेवलेल्या देवाचेगोठणे गणातही घेतली आघाडी
राजापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजापूर मतदारसंघात विजयी झालेल्या आमदार किरण सामंत यांनी राजापूर तालुक्यातून ७,९६९ मतांची आघाडी घेऊन राजापूर तालुक्याचा मूड बदलला असल्याचे सिद्ध केले आहे. महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार राजन साळवी यांना साखरीनाटे आणि सागवे पंचायत समिती गणात नाममात्र आघाडी घेता आली. महायुतीचे विजयी उमेदवार आमदार किरण सामंत यांनी राजापूर शहरासह उर्वरित सर्व पंचायत समिती गणांत चांगले मताधिक्य घेऊन राजापूर तालुका महायुतीसमवेत असल्याचे दाखवून दिले आहे.
मे महिन्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना तब्बल २३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे राजापूर मतदारसंघ महाविकास आघाडीच्या मागे उभा राहील, अशी सुरूवातीची लक्षणे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीने पुरतीच बाजू पलटवली आणि दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत राजापूर तालुक्यातून सामंत यांना ७,९६९ मतांची आघाडी मिळाली.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राजापूर शहरात ७२० मतांची आघाडी होती. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी भरून काढत किरण सामंत यांनी ११७ मतांची आघाडी घेतली.
राजापूर तालुक्यातील बारा पंचायत समिती गणांपैकी दोन साखरीनाटे गणांत ४६ मतांची, तर सागवे पं. स. गणात ८८ मतांची आघाडी मिळाली. किरण सामंत यांना सर्वाधिक आघाडी ओणी पंचायत समिती गणात मिळाली आहे. या गणात सामंत यांना तब्बल १,६७५ मतांची आघाडी मिळाली. अणसुरे गणात सामंत यांना तब्बल १,४९७ मताधिक्य मिळाले.
रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधामुळे उद्धवसेनेने नेहमीच चर्चेत ठेवलेल्या देवाचेगोठणे गणातही सामंत यांनी १६० मतांची आघाडी घेतली. भालावली गणामध्ये सामंत यांनी ७६५, कोदवली गणात ७१४, कोंड्ये तर्फ सौदळ गणात ९९०, केळवली गणामध्ये ७१३, ताम्हाणेत ६३७, पाचल गणात ३९१, ओझर गणात ४४४ मताधिक्य मिळवले.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजापूर शहरातील नऊ मतदान केंद्रांतून महाविकास आघाडीला ७२० मतांची आघाडी होती. यावेळी ही आघाडी भेदून किरण सामंत यांनी ११७ मतांची आघाडी घेतल्याने शहराचे राजकीय चित्रही बदलले असल्याचे स्पष्ट झाले आहे.