आमदार-नगराध्यक्षांमध्ये पाणी पेटले
By admin | Published: May 17, 2016 01:37 AM2016-05-17T01:37:48+5:302016-05-17T01:46:10+5:30
मलुष्टेंना टोला : महेंद्र मयेकर युपीतला भय्या नव्हे-- उदय सामंत : गुरुवारी पालिकेतच पे्रझेंटेशन होणार
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेचे सभागृह हे पालिकेच्या सभांसाठी आहे. त्यात अन्य कोणाला सभा घेता येणार नाहीत. त्यामुळे १९ मे रोजी या सभागृहात सभा घेण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर सल्ला घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करणे भाग पडेल. अशा स्थितीत खासदार विनायक राऊत यांच्याकडून कोणताही गुन्हा घडू नये, अशी अपेक्षा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पत्रकारपरिषदेत केले.
गेल्या आठवडाभरापासून आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्यात पाण्यावरून वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत, उपनगराध्यक्ष विनय तथा भय्या मलुष्टे, प्रमोद शेरे आणि राहुल पंडित यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकारपरिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी पाणी प्रश्नावरून नगराध्यक्षांना ठणकावले होते. १९ मे रोजी पाणी योजनेबाबतचे सादरीकरण नगरपरिषदेत होणारच, असे स्पष्ट केले होते. त्याला आज नगराध्यक्ष मयेकर यांनी पत्रकारपरिषदेत उत्तर दिले.
सभेसाठी आमदार सामंतांकडून आलेल्या पत्राला मुख्याधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे सभागृहात ही सभा घेता येणार नाही. शेरे, सावंत, मलुष्टे व पंडित यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला केला. शेरे यांनी मोठे डोळे करून देणगी, वर्गणीच्या रुपाने खंडणी घेणे थांबवावे व मारुतीआळी रस्त्याकरिता १० फूट जागा देऊन शहर विकासाला हातभार लावावा. शेरे यांच्या घरात फटाके फुटल्यास बाजारपेठ धोक्यात येईल. राहुल पंडित यांनी टायपिंग सेंटर तळमजल्यावर की बेसमेंटला आहे ते आधी पाहावे, मग नैतिकतेबाबत बोलावे. उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांनी प्रथम सकाळी ७ वाजता नगरपरिषदेत येऊन स्वच्छता कामाची माहिती घ्यावी. महेंद्र मयेकर युपीतला भय्या नव्हे, मला ठणकावून सांगू नका, असा शेराही मारला. पाणी योजनेची माहिती देऊनही स्टंट केला जात आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
रत्नागिरी : वाढीव पाणी योजनेचा ६८ कोटींचा प्रस्ताव हा रत्नागिरी पालिकेशी संबंधित आहे आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देणारा आहे. त्यामुळे या प्रलंबित प्रश्नाची तड लावण्यासाठी प्रकल्पाचे प्रेझेंटेशन १९ मे रोजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत होणार आहे. ते पालिकेच्या सभागृहात होऊ न दिल्यास पालिकेच्या कॅम्पसमध्ये अगदी गॅरेजमध्येही घेण्याची आमची तयारी आहे. जनतेचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी शंभर पावले मागे येण्यास आम्ही तयार आहोत. त्याचे ज्यांना राजकारण करायचे त्यांनी जरूर करावे, असे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी पत्रकारपरिषदेत केले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी शहर येते. या शहराला शासनाकडून आलेला निधी व जिल्हा नियोजनमधून दिलेला निधी याचा कसा वापर झाला, याचा आढावा घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. तशी आढावा बैठक गेल्या चार दिवसांपूर्वी आपण पालिकेत घेतली आणि पाणी अचानक पेटले. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्याचा आमचा उद्देश नाही. वाढीव पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाला दिला, ही चागंली गोष्ट आहे. परंतु तो प्रस्ताव ज्या प्रकारे जाणे आवश्यक होते तसा गेलेला नाही. सुकाणू समितीसमोर प्रस्ताव पोहोचला नाही. म्हणून प्रलंबित योजनेचे काम तातडीने व्हावे, यासाठीच आपण सांघिक प्रयत्नासाठी यात पुढाकार घेतला. या प्रकल्पात नेमके काय होणार आहे हे लोकप्रतिनीधी व नगरसेवकांना जाणून घेण्याचा हक्क आहे. आपल्याला कोणतेही श्रेय नको, जनतेला लवकरात लवकर पाणी मिळणे महत्वाचे आहे. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्तीगत पातळीवर आरोप करणे शोभणारे नाही. तिवंडेवाडीतील ४०० सदनिकांच्या संकुलास पाणी देण्यास माझा व खासदार राऊत यांचा विरोधच आहे. पालिकेकडून पारदर्शक कारभाराची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)