आमदार राजन साळवींची दोन तास चौकशी; कार्यालयाबाहेर पडताच कार्यकर्त्यांचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:38 PM2024-01-23T12:38:40+5:302024-01-23T12:39:46+5:30
अटकेचे आदेश निघाले आहेत : साळवी
रत्नागिरी : बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांना भावासह साेमवारी रत्नागिरीतील कार्यालयात चाैकशीसाठी हजर राहण्याची नाेटीस बजावण्यात आली हाेती. साेमवारी ते कार्यालयात हजर हाेण्यासाठी निघताच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. तब्बल दाेन तास त्यांची चाैकशी करुन त्यांना साेडण्यात आले. ते कार्यालयाबाहेर पडताच कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत जल्लाेष केला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार राजन साळवी यांची गेले वर्षभर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी चाैकशी सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी (१८ जानेवारी) त्यांच्या रत्नागिरीतील बंगल्यासह सहा ठिकाणच्या मालमत्तेची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी त्यांना भावासह साेमवारी (२२ जानेवारी) रत्नागिरीतील कार्यालयात हजर राहण्याची नाेटीस बजावण्यात आली.
रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर हाेण्यापूर्वी आमदार साळवी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले. आमदार साळवी चाैकशीसाठी कार्यालयात जाणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते व पदाधिकारीही खासदार राऊत यांच्या कार्यालयात जमा झाले. कार्यकर्त्यांची माेठी गर्दी कार्यालयाबाहेर जमा झाली हाेती. कार्यकर्त्यांसमवेतच आमदार साळवी आणि त्यांचे भाऊ दीपक प्रभाकर साळवी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले.
कार्यकर्त्यांनी आमदार साळवी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. खासदार राऊत यांचे संपर्क कार्यालय ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय असा कार्यकर्त्यांनी जणू माेर्चाच काढला हाेता. कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी करून या कारवाईचा निषेध केला. घोषणाबाजी होत असतानाच आमदार साळवी त्यांच्या दोन्ही भावांसह लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दाखल झाले.
आमदार साळवी आणि त्यांचे भाऊ दीपक साळवी व संजय साळवी यांची दाेन तास चाैकशी करण्यात आली. या चाैकशीत त्यांना मालमत्ता, व्यवसायासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर त्यांना काही कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देत साेडण्यात आले. ते कार्यालयाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत घाेषणाबाजी केली. तसेच जल्लाेष केला.
अटकेचे आदेश निघाले आहेत : राजन साळवी
आमदार राजन साळवी यांनी घोषणाबाजी करत असलेल्या शिवसैनिकांना शांत व संयम राखण्याचे आवाहन केले. त्याचवेळी त्यांनी स्वत:सह पत्नी आणि मुलगा यांना अटक करण्यासाठीचे आदेश निघालेले आहेत. त्यासाठीच मला आणि माझ्या मोठ्या बंधूंना कार्यालयात बोलावण्यात आले आहे, असे स्पष्टपणे सांगितले.