आमदार राजन साळवी यांचे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत, साळवींना प्रलोभन दाखविण्यात आल्याची होती चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 01:21 PM2022-06-24T13:21:35+5:302022-06-24T13:23:48+5:30
आमदार राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी : शिवसेनेचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासाेबत गेल्याने अन्य काेण काेण आमदार त्यांच्यासाेबत जाणार याची चर्चा सुरु आहे. आमदारांच्या जाण्याबाबत चर्चा सुरु असतानाच राजापूरचे आमदार राजन साळवी मतदार संघात दाखल झाले आहेत. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेड येथील कशेडी घाटात त्यांचे रात्री युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे पक्षातील काही आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासाेबत गेले आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी यांना एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल हाेण्यासाठी प्रलाेभन दाखविण्यात आल्याची जाेरदार चर्चा गुरुवारी दिवसभर साेशल मीडियावर सुरु हाेती. मात्र, आमदार राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षाच्या आदेशानुसार मोठे बंधू दीपक साळवी यांच्यासह ते गुरुवारी मुंबईतून आपल्या मतदारसंघाकडे निघाले. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर खेड तालुक्यातील कशेडी घाटात खेड युवासेनेतर्फे रात्री २ वाजता जोरदार फटाके वाजून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांचे प्रेम ही दिसले. यावेळी खेड युवासेना पदाधिकारी प्रसाद पाटणे, दर्शन महाजन, चेतन वारणकर, राकेश सागवेकर, अमित पाटणे, साहिल चिखले, मधुर चिखले, ओंकार चाळके उपस्थित होते.