एस.टी.तील आमदार आरक्षण नावालाच, वापर शून्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:35 AM2021-08-12T04:35:09+5:302021-08-12T04:35:09+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीत प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या सीट आमदारांसाठी आरक्षित असतात. ...
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीत प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या सीट आमदारांसाठी आरक्षित असतात. मात्र, गेल्या आठ ते दहा वर्षांत याचा वापर जिल्ह्यातील एकाही आमदारांनी केलेला नाही. कित्येक वर्षात आपण एस.टी.तच बसलो नसल्याचे आमदारांनी सांगितले. मात्र, त्यांच्या कार्यक्षेत्रासह मंत्रालयात जाण्यासाठी स्वत:च्या वाहनांचा वापर करीत असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात रेल्वे व खासगी वाहतूक सुरू झाल्यापासून एस.टी.तील प्रवाशांचा ओढा कमी झाला आहे. रेल्वे व खासगी वाहतूक सुरू होण्यापूर्वी गर्दीच्या हंगामात आरक्षण उपलब्ध होत नसे, त्यामुळे प्रवासी आमदारांची चिठ्ठी आणून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करीत असत; परंतु आता एस.टी.चे आरक्षण ऑनलाइन उपलब्ध असून उपलब्धताही सहज होत आहे. त्यामुळे आमदारांच्या आरक्षित सीटवर बसून सर्वसामान्य व्यक्तीच प्रवास करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कित्येक वर्षांत एस.टी.तच बसलो नाही
कित्येक वर्षांत एस.टी.तच बसलो नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.त आमदारांसाठी दोन सीटचे आरक्षण सुरुवातीपासून आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांत आपण एस.टी.तच बसलेलो नाही. शिवाय या आरक्षणाचा लाभही घेतलेला नाही. स्वत:चे वाहन असल्याने विधानसभा कार्यक्षेत्र असो वा जिल्ह्यात अन्यत्र जायचे असल्यास किंवा मुंबईला बैठकांसाठी जाण्या-येण्यासाठी स्वत:च्या वाहनाचाच वापर करीत आहे. एस.टी.कडून आमच्यासाठी सन्मानाने सीटचे आरक्षण ठेवण्यात येत आहे. मात्र, याचा वापर कुठल्याच आमदारांकडून होत नाही.
- भास्कर जाधव, आमदार,
गुहागर विधानसभा मतदारसंघ
विद्यार्थीदशेत असताना एस.टी.तून काही वेळा प्रवास केला आहे. मात्र त्यानंतर एस.टी.ने प्रवास करण्याची वेळच आली नाही. आमदारांसाठी एक व दोन क्रमांकाच्या सीटचे आरक्षण असले तरी त्याचा वापर कुणीच करत नाहीत. सुरुवातीला एस.टी.चे आरक्षण उपलब्ध होत नसे त्यावेळी आमदारांच्या चिठ्ठीचा वापर करून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न प्रवाशांकडून होत असे. मात्र, आता तोही प्रकार कालबाह्य झाला आहे. आरक्षण असले तरी सर्वसामान्य प्रवाशांनाच याचा लाभ होत आहे.
-शेखर निकम, आमदार, चिपळूण विधानसभा मतदारसंघ
चारचाकीत फिरणाऱ्यांना
कशाला हवी सवलत
महामंडळाने आमदारांसाठी दोन सीटचे आरक्षण ठेवले आहे. मात्र, आता काळ बदलला आहे. ते स्वत:च्या वाहनातून प्रवास करीत असल्यामुळे एस.टी.तून प्रवास करण्याचा प्रश्नच येत नाही. परिस्थिती बदलाचा स्वीकार करीत आता आरक्षणाच्या नियमात महामंडळाने बदल करण्यास हरकत नाही. नावालाच या सीट आरक्षित असतात.
- राजन जाधव, रत्नागिरी
गर्दीच्या हंगामात एस.टी.त चढताना वाहक ज्या सीटचे आरक्षण आहे, त्याचे क्रमांक सांगतात. त्याचप्रमाणे प्रथम दोन सीट सोडून बसण्याची सूचना करतात. दोन सीट आमदारांसाठी राखीव असल्याचे सर्वांनाच अभिप्रेत आहे; परंतु जर आमदारांकडून त्याचा वापर होत नसेल तर ते आरक्षण आता बदलण्यास हरकत नाही. वास्तविक सामान्य जनता या सीटवर बसून प्रवास करीत आहेत. त्यामुळे नियमातील बदल गरजेचे आहेत.
- शुभदा जोशी, देवरूख