Uday Samant: शिवसेनेचा त्रागा, सामंतांनी पकडला फक्त संयमाचा धागा; दिला सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 05:29 PM2022-07-13T17:29:54+5:302022-07-13T17:31:20+5:30
आमदार उदय सामंत यांनी अजून कोणावरही टीका न करता संयमाची भूमिका घेतली
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : राज्यात घडलेल्या राजकीय नाट्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेतही मोठी खळबळ उडाली. जिल्ह्यातील आमदार उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे दोन भाग होणे अटळ झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सातत्याने त्रागाच केला जात आहे. मात्र आमदार उदय सामंत यांनी अजून कोणावरही टीका न करता संयमाची भूमिका घेतली आहे. त्याचवेळी योग्य वेळी उत्तर देण्याचा सूचक इशाराही दिला आहे.
शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये पहिल्या दिवशी रत्नागिरीतील कोणाचाही समावेश नव्हता. मात्र प्रथम योगेश कदम आणि नंतर उदय सामंत यांनी त्या गटात प्रवेश केला. योगेश कदम यांची समस्या वेगळीच आहे. तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते आधीपासूनच शिवसेनेतून बाजूला फेकले गेले होते. त्यामुळे ते शिंदे गटात जाण्याची शक्यता शिवसेना नेत्यांनाही होती. त्यामुळे त्यांच्या जाण्यावर शिवसेनेकडून तितकीशी टीका झाली नाही.
शिवसेनेच्या नेत्यांनी विशेषत: खासदार विनायक राऊत यांनी आमदार उदय सामंत यांनाच प्रमुख लक्ष्य केले आहे. उपरा, बाटगा अशी अनेक विशेषणे त्यांनी सामंत यांच्याबाबत वापरली आहेत. सामंत यांची राजकीय ताकद, त्यांची क्षमता, त्यांची कार्यपद्धती या साऱ्याची खासदार राऊत यांना कल्पना आहे. त्यामुळे सामंत यांच्या बाजूने जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच शिवसेनेकडून सामंत यांना विशेष लक्ष केले जात आहे. या टीकेमुळे त्यांच्याजवळ जाऊ शकणारे पदाधिकारी व कार्यकर्ते अडवण्याचा उद्देश बाळगून ही टीका केली जात आहे.
तीव्र शब्दांत टीका होत असली तरी अजूनही आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेवर किंवा खासदार विनायक राऊत यांच्यावर एकदाही टीका केलेली नाही. त्यांनी अजूनही आपली सर्व वक्तव्ये संयम राखून व्यक्त केली आहेत.
आताही आपली भूमिका मांडताना त्यांनी खासदार राऊत यांच्या शब्दांमुळे आपल्याला दु:ख झाल्याचे, वाईट वाटल्याचे, खंत वाटल्याचे म्हटले आहे. पण ते ज्येष्ठ नेते असल्यामुळे आपण त्यांच्यावर टीका करणार नाही, अशीच प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली आहे.
सामंत यांची मुत्सद्देगिरी
उदय सामंत गेली अडीच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून आमदार नितेश राणे यांनी खूपदा टीका केली होती. मात्र त्याला टीकेने उत्तर न देण्याची राजकीय मुत्सद्देगिरी उदय सामंत यांनी सातत्याने दाखवली आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा अडीच वर्षाच्या काळात त्यांनी कोणावरही टीका केल्याचे उदाहरण नाही.
निवडणुकीत मोठी मदत
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांना मोठी मदत केली होती. या मदतीमुळेच २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या ३६ टक्के मते मिळवणाऱ्या शिवसेनेला २०१९च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या ५० टक्के मते मिळाली आहेत. त्यावेळी उदय सामंत घेतलेल्या पुढाकारामुळे शिवसेनेची मते वाढली. मात्र आपल्यावरील टीकेला उत्तर देताना ही बाबही सामंत यांनी पुढे आलेली नाही.
अनेकजण तळ्यात मळ्यात
आमदार उदय सामंत यांनी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांना उभे केले आहे. पुढच्या काळातही त्यांच्याकडे मंत्रिपद असेल. त्यामुळे त्यांच्यासोबत जायचे की पक्षात राहायचे, याबाबत अजूनही अनेकजण तळ्यात मळ्यात आहेत. हे राजकीय नाट्य घडल्यानंतर सामंत अजून रत्नागिरीत आलेले नाहीत. ते जेव्हा येतील, तेव्हा हे चित्र स्पष्ट होइल.