आमदार योगेश कदम यांच्या शुभेच्छा फलकावर छेडछाड, दापोली-खेड मार्गावर शिंदेसेनेचा रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 16:55 IST2024-09-12T16:55:13+5:302024-09-12T16:55:41+5:30
दापोली : तालुक्यातील टाळसुरे येथे आमदार योगेश कदम व त्यांच्या पत्नीचा फोटो असलेल्या गौरी गणपतीच्या शुभेच्छांच्या फलकाची छेडछाड करण्यात ...

आमदार योगेश कदम यांच्या शुभेच्छा फलकावर छेडछाड, दापोली-खेड मार्गावर शिंदेसेनेचा रास्ता रोको
दापोली : तालुक्यातील टाळसुरे येथे आमदार योगेश कदम व त्यांच्या पत्नीचा फोटो असलेल्या गौरी गणपतीच्या शुभेच्छांच्या फलकाची छेडछाड करण्यात आल्याने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेत वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
दापोली खेड मार्गावरील टाळसुरे येथे लावलेल्या फलकावर छेडछाड करण्यात आल्याचे कळल्यानंतर तालुक्यात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच नीलेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यांनी दापोली खेड मार्गावर ठिय्या आंदोलन केले. काही काळ वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
आमदार योगेश कदम व त्यांच्या पत्नीचे छायाचित्र असलेले गौरी गणपतीच्या शुभेच्छा देणारे फलक तालुक्यात सर्वत्र लावण्यात आले आहेत. यातील एका फलकाची छेडछाड करण्यात आल्याचे काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर शिवसैनिक हळूहळू एकत्र जमायला सुरुवात झाली. सर्व कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आणि सर्व जण रस्त्यावरच ठिय्या मारून बसले. तोपर्यंत पोलिसही तेथे आले. त्यांनी विनंती केल्याने आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको मागे घेण्यात आला.