शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात, विनायक राऊतांचा गौप्यस्फोट
By मनोज मुळ्ये | Published: July 6, 2023 02:15 PM2023-07-06T14:15:48+5:302023-07-06T14:17:30+5:30
मंत्रिपदावर डोळा ठेवून शिंदे गटातील अनेकांनी नवीन कपडे शिवले. मात्र..
रत्नागिरी : राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले आठ ते दहा आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी रत्नागिरीत केला. गद्दारांना परत घेऊ नये, अशी अनेकांची भावना आहे. त्यांच्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी दौर्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांवरच टीकेचा भडिमार केला. सध्याच्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत. इतके गलिच्छ राजकारण सुरू आहे. ही महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे. जे सुरू आहे, ते किळसवाणे आहे, असे ते म्हणाले.
ज्या दिवशी राष्ट्रवादीतील आमदारांनी भाजपमध्ये उडी मारली, तेव्हाच शिंदे गटातील आमदारांनी उडी मारण्याची तयारी सुरू केली आहे. पश्चित महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून आठ ते दहा आमदारांनी परत येण्यासाठी थेट संपर्क केला आहे. गद्दारांना परत घेऊ नये, अशी पदाधिकार्यांची भावना आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे ते म्हणाले.
मंत्रिपदावर डोळा ठेवून शिंदे गटातील अनेकांनी नवीन कपडे शिवले होते. मात्र त्यांना कळले आहे की आपली वर्णी लागणार नाही. त्यामुळे काही आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या अंगावरही धावून गेले असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. ९ जुलैपासून त्यांचा दौरा सुरू होईल. यवतमाळला पोहरादेवीचे दर्शन घेऊन ते दौरा सुरू करतील. पहिले दोन दिवस यवतमाळ, अमरावती, नागपूर असा त्यांचा दौरा असेल. १३ व १४ जुलैला ते हिंगोली आणि परभणीचा दौरा करतील, असे ते म्हणाले.