Raj Thackeray: राज ठाकरे बारसू रिफायनरीबाबत कोणती भूमिका मांडणार?; रत्नागिरीत आज सभा, राज्याचं लागलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:38 PM2023-05-06T12:38:03+5:302023-05-06T12:38:10+5:30
Raj Thackeray: सध्या रत्नागिरीत बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलचं तापलं आहे.
मनसेप्रमुखराज ठाकरे यांची आज सायंकाळी ६ वाजता रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांची रत्नागिरीत प्रथमच सभा होत असल्याने, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सध्या रत्नागिरीत बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील बारसूमधील रिफायनरी विरोधकांची भेट घेतली. नागरिकांना प्रकल्प समजून सांगा. रिफायनरी प्रकल्प लादला, तर महाराष्ट्र पेटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे देखील रिफायनरीबाबत कोणती भूमिका मांडणार, याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.
डिसेंबर महिन्यात कोकण दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी कोकणात जाहीर सभा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. या सभेसाठी रत्नागिरी किंवा मालवण यापैकी ठिकाणाची चाचपणी सुरू होती. अखेर रत्नागिरीत सभा घेण्याचे जाहीर करण्यात आले. पक्ष स्थापनेनंतर राज ठाकरे यांची प्रथमच रत्नागिरीत सभा आयोजित करण्यात आल्याने उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर पक्षाचे झेंडे लावण्यात आले असून, ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत.
मनसेने केला ट्रेलर जारी-
स्वाभिमानाची पालखी दिमाखात नाचवणाऱ्या कोकणी माणसाच्या समृद्धीसाठी राजगर्जना... ६ मे २०२३, चला रत्नागिरीला !#कोकण_राजगर्जनाpic.twitter.com/rMK0q37uSi
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 5, 2023