शिवसेनेत नाराज असलेले रामदास कदम सरकार अस्थिर करत आहेत; वैभव खेडेकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 12:00 PM2021-09-19T12:00:41+5:302021-09-19T12:00:47+5:30

अनिल परब यांच्याबाबतची दापोलीतील माहिती काढून देण्यासाठी रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे या त्यांच्या माणसाचा वापर केला, असा आरोप मनसेचे खेडमधील नगरध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

MNS Khed mayor Vaibhav Khedekar has criticized Shiv Sena MLA Ramdas Kadam | शिवसेनेत नाराज असलेले रामदास कदम सरकार अस्थिर करत आहेत; वैभव खेडेकरांचा आरोप

शिवसेनेत नाराज असलेले रामदास कदम सरकार अस्थिर करत आहेत; वैभव खेडेकरांचा आरोप

googlenewsNext

खेड: शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना शिवसेनेत किंमत राहिली नसल्याने आपल्या माणसांना पुढे करून  स्वतःचे सरकार अस्थिर करण्यासाठी काम करत आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना मंत्री अनिल परब यांच्याबाबतची दापोलीतील माहिती काढून देण्यासाठी रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे या त्यांच्या माणसाचा वापर केला, असा आरोप मनसेचेखेडमधील नगरध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

वैभव खेडेकर यांच्या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असताना महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील खेडेकर म्हणाले. रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या देखील बेनामी संपत्तीचे माहिती जगासमोर आणावी त्यांची देखील ईडीची चौकशी लावावी, असे आवाहन देखील वैभव खेडेकर यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट बाबत माहिती उघड केली होती. हे रिसॉर्ट मंत्री परब यांनी बे-हिशोबी पैशातून बांधले असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्री पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी प्रसारमाध्यमांसमोर केली होती. सोमय्या यांना दिलेली सर्व माहिती प्रसाद कर्वे नामक व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली मागवून ती माहिती रामदास कदम यांनी त्यांचे मित्र भाजपचे किरीट सोमय्या यांच्याकडे दिली. सोमय्या हे खरोखर भ्रष्टचाराविरोधात लढत असतील तर त्यांनी रामदास कदम यांची देखील ईडीची चौकशी लावावी आपले त्यांना आवाहन आहे असे वैभव खेडेकर म्हणाले.

यावेळी ते पुढे म्हणाले, माझ्या विरुद्ध तक्रार करताना ज्या प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तीने माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती मिळवली ती त्याने दुसऱ्याला देऊन माहिती अधिकार कायद्यातील एका कलमाचे उल्लंघन केले आहे. कर्वे यानेच दापोलीत पालकमंत्री अनिल परब यांच्या संदर्भात माहिती अधिकारात माहिती घेऊन रामदास कदम यांना दिली व रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना दिली. रामदास कदम यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रसाद कर्वे याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे खेडेकर म्हणाले. रामदास कदम यांनी केवळ त्यांच्या मुलाच्या आमदारकीच्या काळात खेड पालिकेची सत्ता मिळवता यावी या स्वार्थासाठी माझ्या विरोधात कट रचला आहे.  मी लढवय्या आहे. गेल्या पंधरा वर्षे शहरवासीयांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे.

रामदास कदम स्वतः आमदार होण्यापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती काय होती व आता त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता कशी आली याची ईडी मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वापरून रामदास कदम माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांविरोधात मला राजकारणापासून दूर नेण्याचा कट रचत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत समोरासमोर लढून जिंकून दाखवावे, असं आवाहन देखील खेडेकर यांनी दिलं आहे. तसेच खेड शहरासाठी कोरोना साथ, अतिवृष्टी आदी परिस्थितीत मी केलेल्या कामामुळे व  विकास कामे यामुळे जनता माझ्या सोबत आहे. दहशतीची राजवट खेडला नको आहे. माझ्या सोबत थोडे कार्यकर्ते असले तरी ते निष्ठावंत आहेत. त्यामुळे मी पुन्हा सत्तेत येईन, असा विश्वास वैभव खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Web Title: MNS Khed mayor Vaibhav Khedekar has criticized Shiv Sena MLA Ramdas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.