तुमच्या जमिनींचा व्यापार होतोय, जागे राहा; राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 10:55 PM2023-05-06T22:55:11+5:302023-05-06T22:56:18+5:30

ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का? राज ठाकरेंचा सवाल

mns leader raj thackeray commenter nanar barsu refinery project not to sell land | तुमच्या जमिनींचा व्यापार होतोय, जागे राहा; राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान

तुमच्या जमिनींचा व्यापार होतोय, जागे राहा; राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान

googlenewsNext

रत्नागिरी : तुमचे लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत. कोकणात कोणत्या भागात प्रकल्प येणार आहे, हे त्यांना माहिती असते. ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का ? अशा कोणालाही जमिनी विकू नका, जागे राहा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासीयांचे कान टोचले.

रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे शनिवारी (६ मे) झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी कोकण विकासाच्या मुद्द्यावरून सध्याच्या आणि आधीच्या सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. पर्यटन, कोकणातील गडकिल्ले, कोकणात येणारे उद्योग आणि त्याच्या जमिनींच्या व्यवहारातील घोटाळा या साऱ्यांवर राज यांनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत सणसणीत प्रहार केले.
४० मिनिटांच्या मोजक्या, पण थेट भाषणात ठाकरे यांनी सुरुवातीलाच जमिनींच्या विक्रीबाबत कोकणी माणसाचे कान टोचले. याआधी एन्रॉन, अणुऊर्जा यांसारखे प्रकल्प येण्याआधीच कोकणी लोकांनी व्यापाऱ्यांना आपल्या जागा विकल्या. आता नाणार, बारसूबाबतही तेच होत आहे. जमिनी पायाखालून जात आहेत, तरीही कोकणी माणसाला कळत कसे नाही, असा थेट प्रश्नच त्यांनी केला. इथले लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत आणि लोकांच्या जमिनींचे मोठमोठे व्यवहार करत आहेत. हेच कोकणी माणसाशी बोलण्यासाठी आपण आलो असल्याचे ते म्हणाले.

प्रकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले की, नाणारमध्ये होणारा प्रकल्प अचानक बारसूत कसा गेला ? कुठून आले हे नाव ? या बारसूमध्ये कातळशिल्पे आहेत, जी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होत आहेत. अंतिम यादीत या कातळशिल्पांचे नाव आल्यानंतर आसपासच्या तीन किलोमीटर परिसरात कसलेही बांधकाम करता येणार नाही. मग तिथे प्रकल्प कसा होणार ? लोकांना सतत अंधारात ठेवले जात आहे. म्हणूनच जमिनी विकू नका, काेकण वाचवा, अशी विनंती त्यांनी हात जोडून केली. पर्यटनाच्या क्षेत्रात कोकणात इतकी उपलब्धता आहे की, कोकण राज्याला पोसू शकतो. मात्र, त्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले.

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष

उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता राज ठाकरे यांनी त्यांना टोला हाणला. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. म्हणाले, लोकांची भावना असेल तीच आमची भावना. म्हणजे काय ? बाळासाहेबांचे नाव घेऊन महापौरांचा बंगला ढापताना लोकांना त्यांची भावना विचारली होती का, असा थेट प्रश्नच राज ठाकरे यांनी विचारला. जनतेचे हित कशात आहे, हे बघण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. पण, तेच म्हणतात, लोकांची भावना तीच आमची भावना. अशाने विकास कसा होणार, असा प्रश्नही त्यांनी केला.


पवार यांच्यावरही कडाडून टीका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला मी विरोध करत असल्याचे शरद पवार यांनी पसरवले. मात्र या पवार यांनी आजपर्यंत एकदाही आपल्या भाषणात शिवछत्रपतींचे नाव घेतलेले नाही. आपला विरोध शिवछत्रपतींच्या स्मारकाला असूच शकत नाही. पण पुढच्या पिढीला इतिहास कळायला हवा असेल तर आधी महाराजांचे गडकिल्ले चांगले ठेवा, ती खरी स्मारक आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: mns leader raj thackeray commenter nanar barsu refinery project not to sell land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.