Raj Thackeray : "शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता, पण अजित पवारांच्या वागण्यामुळे..," राज ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 08:19 PM2023-05-06T20:19:10+5:302023-05-06T20:19:39+5:30
राज ठाकरेंचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल.
“मागे कोकणात आलो होतो. सभा सगळ्याच ठिकाणी करायचं ठरवलं पहिल्यांदा रत्नागिरी निवडलं. बरेच विषय तुंबलेत, नालेसफाई होणं गरजेचं आहे. संपूर्ण राज्याची राजकीय परिस्थिती काही वर्ष समजेनाशी झाली. आमदार समोर आले की सध्या कुठाय असं विचारावं लागतं,” असं मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या रत्नागिरीतील सभेदरम्यान म्हणाले. यावेळी त्यांनी बारसूसह मुंबई गोवा महामार्गासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
यावेळी त्यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. “दुसरीकडे राजीनाम्याचा विषय सुरू होता तो काल संपला. त्यांना खरंच राजीनामा द्यायचा होता असं मला वाटतं. त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार ज्याप्रकारे वागले ते पवारांच्या डोळ्यादेखत होत असताना मी आता राजीनामा दिला हे असं वागतायत. उद्या ते जसं बोलत होते तसं मलाही सांगतील या भीतीपोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा. होतंय ते बरं होतंय अशा उकळ्या फुटत होत्या. पण तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.
आज कोकणात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते उभे राहण्याची कारणं तुम्ही आहात. तुम्ही त्याच त्याच व्यापारी लोकप्रतिनिधींना निवडून देऊन, पक्षाला निवडून दिलं, त्यांनी कोकणाचा व्यापार केला. तुम्ही तिकडेच आहात, असं ते यावेळी म्हणाले. २००७ ला सुरू झालेला मुंबई गोवा रस्ता अजूनही काही नाही. मधले पॅचेस झालेत. मी मागेही फडणवीसांना फोन केला. मला त्यांनी गडकरींशी बोलायला सांगितलं. त्यांना मी फोन केला. तेव्हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टर पळून गेल्याचं सांगितलं. ज्यांना आजवर निवडून दिलं त्यांनी आजवर यावर काही विचारलं का? या लोकांना मतदानाशी संबंधित विषय आहे फक्त. तोच समृद्धी महामार्ग पाहा. सुरू पण झाला आणि तेही चार वर्षात. नागपूर ते शिर्डी आणि पुढचं काम सुरू आहे, आता गाड्या फिरतायत. १६ वर्ष आमचा रस्ता पूर्ण होत नसल्याचं खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.