"मला तुमची साथ हवी आहे", राज ठाकरेंचा 'एकला चलो’चा नारा', जनतेला केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 07:57 PM2023-07-13T19:57:46+5:302023-07-13T19:58:12+5:30
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत.
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आता नगरपरिषदेच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रातील जनता त्यांचा राग व्यक्त करते का, की पुन्हा पैशांच्या तमाशावर विकली जातेय. पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी होणार असतील अन् तुम्ही त्यांनाच मतदान करत असाल तर त्याला काही अर्थ नाही, असे राज यांनी सांगितले.
तसेच राज्यात जे काही चालले आहे ते पाहून आनंद वाटत असेल तर भोगा. मी राज ठाकरे सतत जे सांगतोय हे फक्त वर्तमानापुरतेच नाही तर भविष्यात येणाऱ्या पिढ्या काय पाहणार आहेत याचा विचार करा. जो या सगळ्या लोकांनी चिखल केला त्यात सर्वांना घालायचं की नवनिर्माण करायचं याचा विचार जनतेने करायला हवा. याबद्दल मला जे काही जनतेशी बोलायचं आहे ते मी बोलेनच, असेही त्यांनी म्हटले.
राज ठाकरेंचा 'एकला चलो’चा नारा
"मला तुमची साथ हवी आहे, ऐन मोक्याच्या वेळी सर्वांची साथ हवीय. मला एवढंच सांगायचं आहे की आत्तापर्यंत झालं ते झालं आता नगरपरिषदेच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत. कोणाच्या युत्या नको तसल्या भानगडीच नकोत. खेडमध्ये नगरपरिषदेत निश्चितच खेडमधील जनता आपल्याला निवडून देईल", असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.
कोकणातील रस्ते का रखडले - राज
मनाला प्रश्न विचारा की आमच्या कोकणातला रस्ता १७ वर्ष झाली तरी पूर्ण का होत नाही. समृद्धी महामार्ग फक्त चार वर्षांत पूर्ण झाला. मागच्या वेळी आलो तेव्हा नितीन गडकरींना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले स्थानिक कॉन्ट्रॅक्टर पळून गेले आहेत. हे ऐकल्यावर तुम्ही हसू नका गांभीर्याने विचार करा. समोरचे खड्डे पाहून आपण जे काही भोगतो आणि पुन्हा त्यांनाच निवडून देतो. आज ज्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली त्यांची लवकरच कार्यशाळा घेतली जाईल. ज्या चौकटी आखून देईन तसेच काम करा. कोकणवासियांना काहीतरी वेगळे देण्यासाठी मी तुमच्या मनगटात ताकद देण्याचा प्रयत्न करतो आहे, असे राज ठाकरेंनी नमूद केले.