बनावट पॅनकार्डद्वारे मोबाईल खरेदी, फायनान्स कंपनीचे हात वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 01:56 PM2021-03-05T13:56:29+5:302021-03-05T13:57:56+5:30
Crimenews Ratnagiri -बनावट पॅनकार्ड व आधार कार्डचा वापर करीत रत्नागिरीतील विविध मोबाईल दुकानांतून कर्जावर मोबाईल खरेदी करीत दुकानदारांना चुना लावण्याच्या घटना रत्नागिरीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मोबाईल खरेदी केलेल्या ग्राहकांकडून हप्ते थकल्यामुळे ही बाब समोर आली आहे. या प्रकारानंतर रत्नागिरी शहरातील दुकानदारांनी पोलीस स्थानकाकडे धाव घेतली आहे.
रत्नागिरी : बनावट पॅनकार्ड व आधार कार्डचा वापर करीत रत्नागिरीतील विविध मोबाईल दुकानांतून कर्जावर मोबाईल खरेदी करीत दुकानदारांना चुना लावण्याच्या घटना रत्नागिरीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मोबाईल खरेदी केलेल्या ग्राहकांकडून हप्ते थकल्यामुळे ही बाब समोर आली आहे. या प्रकारानंतर रत्नागिरी शहरातील दुकानदारांनी पोलीस स्थानकाकडे धाव घेतली आहे.
सध्या बजाज फायनान्स कंपनीद्वारे रत्नागिरीतील अनेक मोबाईल विक्रेते सुलभ हप्त्यांवर ग्राहकांना मोबाईल देतात. अनेकजण या सुविधेचा फायदा घेत महागडे मोबाईल खरेदी करतात. यासाठी दुकानदार संबंधित ग्राहकाकडून पॅनकार्ड व आधारकार्डची झेरॉक्स घेतात व सीबील स्कोअर तपासून त्या ग्राहकाला सुलभ हप्त्यांवर मोबाईल दिला जातो. मात्र, काही भामट्यांनी दुसऱ्या नावाची बनावट पॅन कार्ड बनवून त्यावर आपला फोटो लावून रत्नागिरीतील अनेक दुकानांतून महागडे मोबाईल खरेदी केल्याच्या घटना आता उघडकीस येऊ लागल्या आहेत.
कर्जावर देण्यात आलेल्या मोबाईलचा पहिला हप्ता थकल्यावर ही बाब दुकानदारांच्या लक्षात आली आहे. मोबाईल हप्त्यावर देताना ग्राहकाने हप्ते वेळेवर न भरल्यास त्या दुकानदाराला ते हप्ते भरावे लागत असल्याने आता ही घटना घडल्यावर फायनान्स कंपनीनेही आपले हात वर केले आहेत. अशा पद्धतीने दुकानदारांना गंडा घालणारी ही टोळी रत्नागिरीत कार्यरत झाली आहे.
मोबाईल परराज्यात
रत्नागिरीतून विकलेल्या मोबाईलचा आयएमई नंबरद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा हे मोबाईल परराज्यात ॲक्टिव्हेट असल्याचे दिसत आहे. रत्नागिरीत खरेदी केलेले मोबाईल परराज्यात गेल्याचे समोर येत आहे. त्याचा गैरवापर होण्याची अधिक भीती आहे.