रेल्वेविरोधात कोकण भवनावर मोचा
By Admin | Published: September 9, 2014 11:36 PM2014-09-09T23:36:50+5:302014-09-09T23:47:50+5:30
ढिसाळ कारभार : प्रवासीवर्गातून व्यक्त केला जातोय संतार्प
पाचल : कोकण रेल्वेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. बहुतांश प्रवाशांना अनंत अडचणीना तोंड देऊन मानसिक त्रास सहन करावा लागला. परिणामी कोकण रेल्वेच्या या गलथान कारभाराबद्दल तमाम कोकणवासीयांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्या कोकण रेल्वेचे चेअरमन व सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.
ऐन गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर मालवाहतुकीचे डब्बे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक कोलमडली. त्यामुळे लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या ८ ते १० तास उशिरा धावत होत्या. एकंदरीत गर्दीच्या हंगामातच रेल्वेची यंत्रणा कोलमडून पडली होती. प्रवाशांनी सहा सहा महिने अगोदर तिकीट आरक्षण करुन देखील कोकण रेल्वे व सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रवाीस वाहतुकीचे नियोजन करता आले नाही. या अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका कोकणातील लाखो प्रवाशांना बसला. त्यामुळे या अकार्यक्षम अधिकाऱ्यांची हकालपट्टी करुन त्यांच्या गलथान कारभाराची चौकशी करण्याची मागणी केळुसकर यांनी केली आहे.
कोकण रेल्वेची क्षमता प्रवासी वाहतूक करण्याएवढीच मर्यादित असताना या मार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुरु आहे. त्यामुळे हा मार्ग खचण्याचा पुन्हा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कोकण रेल्वे मार्गाचे तातडीने दुपदरीकरणाचे काम सुरु करण्याची मागणी केळुसकर यांनी केली आहे. कोकण रेल्वे व सेंट्रल रेल्वेने एक पत्रक काढून कोकण रेल्वेच्या काही जादा गाड्या व अन्य गाड्या प्रवाशांअभावी बंद करण्याचा अधिकाऱ्यांचा डाव आखला आहे. अधिकाऱ्यांचे हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी कोकणातील काही सामाजिक संघटनांनी १६ सप्टेंबर २०१४ रोजी कोकण रेल्वे भवन येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात कोकण विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते ताकदीनिशी उतरणार आहेत. तमाम कोकणवासीयांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केळुसकर यांनी केले आहे. (वार्ताहर)
कोकण रेल्वेच्या ढिसाळ कारभाराविरोधात प्रवासी संताप व्यक्त करीत असून गणेशोत्सवात रेल्वेच्या मर्यादा उघड झाल्यामुळे हा प्रकार काय आहे असा सवाल करून . अधिकाऱ्यांची चौकशी करावी या प्रकरणी मध्य रेल्वेलाही जबाबदार धरावे असे केळूसकर म्हणाले.