मोदी सरकार फार काळ टिकणार नाही!, आमदार भास्कर जाधव यांचा दावा

By संदीप बांद्रे | Published: June 12, 2024 05:56 PM2024-06-12T17:56:47+5:302024-06-12T17:57:01+5:30

''भाजपचे सरकार सत्ताधीश नव्हे, सत्ताचीट झाले आहे''

Modi government will not last long, MLA Bhaskar Jadhav claims | मोदी सरकार फार काळ टिकणार नाही!, आमदार भास्कर जाधव यांचा दावा

मोदी सरकार फार काळ टिकणार नाही!, आमदार भास्कर जाधव यांचा दावा

चिपळूण : भाजपचे सरकार सत्ताधीश नव्हे, सत्ताचीट झाले आहे. ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपला अपेक्षीत यश मिळाले नाही. या निवडणूकीत डोक्यात हवा गेलेल्यांना देशातील मतदारांनी जागेवर आणलं आहे. लोकशाहीत जनता हीच सर्वोच्च आहे. जे जनतेला विसरतता ते फार काळ टिकत नाहीत. केंद्रात सत्तेवर आलेले मोदी सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा उद्धव ठाकरे सेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केला. गुहागर विभानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते.

रायगड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांना गुहागर मतदार संघातून २७  हजाराचे मताधिक्य मिळाले. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याचे आभार आणि नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्याच्या हेतूने आमदार भास्कर जाधव यांनी शहरातील बांदल हायस्कूल येथे कार्यकर्ता मेळावा आज, बुधवारी आयोजित केला होता. 

मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार जाधव म्हणाले की, शिवसेना पक्ष आणि चिन्ह चोरले नसते, तर त्यांचे ४ देखील खासदार आले नसते. यावेळच्या लोकसभा निवडणूकीत आपण १८ मतदार संघात प्रचार केला. तेथे महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. गतवेळी विजयी झालेल्या जागा या निवडणूकीत सोडाव्या लागल्या ही पक्षाची चूक झाली. गुहागर मतदार संघात आपण प्रचाराचे योग्य नियोजन केले होते. प्रचासाठी आवश्यक साधनसामुग्री मिळाली नाही, कार्यकर्त्याना बळ दिले नाही. आपण मतदार संघात केवळ चारच सभा घेतल्या, तरिदेखील अनंत गितेंना २७ हजार ७००चे मताधिक्य मिळाले. कार्यकर्त्यानी मोठे मताधिक्य देऊन माझी ईज्जत वाचवल्याचे जाधवांनी स्पष्ट केले. 

आगामी विधानसभा निवडणूकीबाबत ते म्हणाले की, राज्यातील ६० आमदारांच्या मतदार संघाची जबाबदारी पक्षाने आपल्यावर सोपवली आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना वाढण्यासाठी आपण आपले कौशल्य पणाला लावणार आहे. तर गुहागर मतदार संघात आपल्या विरोधी कोण उमेदवार असेल असे वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम आणि बौद्ध समाज एकमताने महाविकास आघाडी सोबत राहिल्यानेही मोठे मताधिक्य मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

या मेळाव्यात नवनिर्वाचीत जिल्हाप्रमुख संजय कदम, प्रभाकर जाधव, जितेंद्र चव्हाण, प्रभाकर कदम यांचा सत्कार करण्यात आला. तर पक्षाने आमदार जाधव यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. मेळाव्यास गुहागर व खेडचे तालुकाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

विक्रांत जाधव यांना गुहागर मतदारसंघातून उमेदवारी द्या

गुहागर मतदार संघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव सातत्याने संपर्कात आहेत. त्यांच्याकडे संघटन कौशल्य देखील मजबूत आहे. त्यामुळे पक्षांने त्यांना गुहागर मतदार संघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूकीत या मतदार संघातून ५० हजाराचे मताधिक्य देण्याचा निर्धारही कार्यकर्त्यानी व्यक्त केला.

Web Title: Modi government will not last long, MLA Bhaskar Jadhav claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.