मोदींनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे कान उपटावेत, रामदास कदम यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 11:49 AM2024-03-08T11:49:54+5:302024-03-08T11:50:17+5:30
खेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये शिवसेना किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी ...
खेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये शिवसेना किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी झाली आहे. आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. सगळ्याच जागांवर दावा करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे पंतप्रधान मोदी यांनी कान उपटायला हवेत, असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला.
खेड तालुक्यातील जामगे येथे निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील भाजपवर तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर सणसणीत टीका केली. जेथे ज्या पक्षाचा खासदार आहे, ती जागा त्याच पक्षाला मिळायला हवी. अशा जागांवरही भाजपची मंडळी प्रयत्न करत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, संभाजीनगर या मतदारसंघात महाराष्ट्रातल्या भाजपकडून जे चालले आहे ते अतिशय घृणास्पद आहे. पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी महाराष्ट्रातील काही भाजपा नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, असे ते म्हणाले.
तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक आले आहेत, त्यांचा केसाने गळा कापू नका. यातून एक वेगळा संदेश जातोय, याचे भान भाजपच्या काही लोकांना नाही. दापोली मतदारसंघात आपल्या मुलाला बाजूला ठेवून भाजपचे लोक काम करत आहेत. याची दखल वरिष्ठ पातळीवर भाजपच्या मंडळीनी घेतली पाहिजे. मागच्या निवडणुकीत काय झाले मला माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा आमचा विश्वासघात झाला तर, माझंही नाव रामदास कदम आहे, हे ध्यानात ठेवा,असा इशारा त्यांनी दिला.
जागेची मागणी कोणीही करू शकतो, पण मतदारसंघात कोणाचं वर्चस्व आहे ते पाहिले पाहिजे. सगळ्या ठिकाणी कमळच न्यायचे आणि इतर सगळ्यांना नेस्तनाबूत करायचं, असं चाललं आहे की काय, अशी शंका आपल्याला येत आहे. पण, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यामध्ये दखल देतील आणि असं होऊ देणार नाहीत, असा विश्वास आपल्याला असल्याचेही त्यांनी सांगितले.
राम मंदिर, ३७० कलम याचा उल्लेख करून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. राम मंदिर व ३७० कलम हटवणे, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने ज्यांनी साकार केलं, त्यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांना आदर हवा होता. पण उद्धव ठाकरे आज काँग्रेसचे पाय चाटत आहेत. सकाळी उठल्यापासून त्यांना फक्त मोदी दिसतात.