मोकाट जनावरे, हतबल प्रशासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:30+5:302021-09-16T04:39:30+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील शहरे, महामार्ग येथील माेकाट जनावरे, उनाड श्वान यांचा बंदोबस्त कोण करणार? असा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील शहरे, महामार्ग येथील माेकाट जनावरे, उनाड श्वान यांचा बंदोबस्त कोण करणार? असा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. रस्त्याच्या मधोमध उभा असलेला मोकाट जनावरांचा कळप, त्यांच्याकडून होणारा दुकानदारांना त्रास तसेच वाहनांचे होणारे अपघात, असे अनेक प्रकार सतत सुरू असतात. तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याबद्दल खेद व्यक्त करण्यापलीकडे काय करणार, असेच म्हणावे लागेल. लोकांचे जीव गेले तरी चालतील, पण मोकाट जनावरांचा प्रश्न तसाच रेंगाळत ठेवणार, अशी शपथच घेतली आहे की काय, असे प्रशासनाच्या भूमिकेमुळे वाटू लागले आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न सुटणार की नाही? की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जाणार?
मोकाट जनावरे, उनाड श्वान यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने ठाेस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिक, दुकानदार त्रस्त, ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी, मध्येच जनावरांमध्ये टक्कर सुरू, वाहतुकीचा खोळंबा, ही बाब रत्नागिरीकरांसाठी नित्याचीच झाली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या जनावरांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास कुणीही पुढे येत नाही. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविलीच तर ती दिखाव्यापुरतीची असते. त्यामुळे पुन्हा जनावरे मोकाट सुटलेली असतात. शहराच्या मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात मोकाट जनावरांचा मुक्तसंचार सुरू आहे. जनावरांचा हैदोस एवढा वाढला आहे की, नागरिकही मोकाट जनावर दिसले की काढता पाय घेतात.
शहरासह महामार्गावरही ठिकठिकाणी मोकाट जनावरांचे कळप दिसून येतात. काही ठिकाणी जनावरे चक्क रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन आंदोलन केल्यासारखे बसलेले असतात. वाहनचालकांनी कितीही हाकलले तरी उठायचे नाव घेत नाहीत. बसस्थानक परिसर व बाजारपेठेत अशा गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा सतत वावर असतो. या जनावरांना कोणी हाकलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर चालून येण्याची भीतीही असते. मोकाट जनावंरामुळे विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर हातगाडीवर भाज्या, फळे विकणाऱ्यांना तर या जनावरांचा हमखास त्रास असतो. विक्रेत्याचे थोडे जरी लक्ष विचलित झाले तरी जनावर भाजी, फळांवर ताव मारतात. तसेच ऐन गर्दीच्या होणाऱ्या टकरींमुळे वाहनधारकांची त्रेधा उडते. जीवाच्या भीतीने वाहनधारक सैरावैरा पळतात. त्यातून अपघातही घडत असतात. त्यामध्ये लोक जखमी होत असतात. हे प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. जनावरांना कोंडवाड्यात टाकले तर मालकही न्यायला येत नाहीत. आलाच तर एखाद दुसरा मालक येतो. जनावरांच्या मालकांचाही शोध घेतला जात नाही.
शहर परिसरामध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहराच्या अनेक भागांत रात्रीच्या वेळी भटके श्वान घोळका करून बसलेले असतात. रात्रीच्या वेळी कोणी जात असल्यास त्यांच्या अंगावर धावून जातात. यातून अपघात होणे, वाहनचालक पडणे, वाहनांचे नुकसान होणे असे प्रकार घडतात. श्वानदंशाने जखमी झालेल्यांचेही प्रमाण कमी नाही. रात्रीच्या वेळी कामावरून उशिरा येणाऱ्यांना भटक्या श्वानांचा कायमचा त्रास आहे. अनेकदा श्वानदंशामुळे बालके मृत्यूच्या घटनाही घडलेल्या आहेत. याला जबाबदार कोण, तर त्याचे उत्तर कोणाकडे आहे का? तर नाही. कारण यांचा बंदोबस्त करणाऱ्यांचेही नेहमीच कानावर हात असतात आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. त्यामुळे लोक तरी काय करणार, आपले रत्नागिरीकर केवळ बघ्याची भूमिका घेतात.