परिचारिकेवर अत्याचार करणारा ४८ तासानंतरही मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:22 AM2021-06-20T04:22:01+5:302021-06-20T04:22:01+5:30
चिपळूण : शहरातील गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेला नराधम ४८ तासानंतरही मोकाटच आहे़ पोलिसांनी ...
चिपळूण : शहरातील गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेला नराधम ४८ तासानंतरही मोकाटच आहे़ पोलिसांनी मात्र तपासाला वेग दिला असून, या प्रकरणातील काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तर पीडित तरुणीच्या तब्येतीत सुधारणा झाली असून, शनिवारी उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. मात्र तिला प्रचंड मानसिक धक्का बसल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळत आहे.
शहरातील मध्यवर्ती एसटी बसस्थानक भोगाळे हा परिसर म्हणजे दिवस-रात्र गजबजलेला. सध्या बाजारपेठ सायंकाळनंतर बंद हाेत असल्याने परिसरात काहीशी शांतता असते. त्यातच मुसळधार पाऊस पडत असल्याचा फायदा उठवत ३० वर्षीय नराधम तरुणाने परिचारिकेला गाठून अमानुषपणे तिला खेचत घेऊन जात रस्त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर तिच्यावर पाशवी अत्याचार केला आणि पसार झाला.
गुरुवारी सायंकाळी ७.४५ वाजता ही घटना घडली़ लैंगिक अत्याचार करून परत दगडाने ठेचून पीडित तरुणीला जखमी करणे, या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी या घटनेची दखल घेत पुढील हालचाली सुरू केल्या आहेत. एसटी स्थानक परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जमा करून निरीक्षणही केले आहे. लगेचच पसार झालेल्या नराधमाच्या शोधावर पोलिसांचे पथक पाठविण्यात आले. ठसेतज्ज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण करून तपासाची दिशा ठरविण्यात आली आहे. याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन तपासाबद्दल मार्गदर्शनही केले आहे. या घटनेला तब्बल ४८ तास उलटून गेले, तरी अत्याचार करून पसार झालेला नराधम मोकाट आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत तरी तो पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता. तपासाचा भाग म्हणून पोलीस आता या प्रकरणात अधिक माहिती देण्यास नकार देत आहेत.
या घटनेची वेळ त्यापूर्वी व त्यानंतर असे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासल्यानंतर संशयिताची हालचाल स्पष्ट होत असल्याने त्या दृष्टिकोनातून तपासाला वेग देण्यात आला आहे.
पीडितेने केलेले संशयिताचे वर्णन तसेच सीसीटीव्ही फुटेजमधील संशयिताची हालचाल याची सांगड घालण्याचे काम केले जात असून, तपास योग्य मार्गाने पुढे जात असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे नराधम तरुण लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.