तब्बल १५ महिन्यांनी तिवरेवासियांच्या पुनर्वसनाला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:44 PM2020-10-17T17:44:13+5:302020-10-17T17:50:12+5:30
chiplun, tiwre, dam, ratnagirinews चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेनंतर तब्बल १५ महिन्यांनी बाधितांच्या पुनर्वसन वसाहत कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुंबईतील सिध्दिविनायक ट्रस्टने मंजूर केलेल्या एकूण ११ कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम २४ घरे बांधण्यात येत आहेत.
चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेनंतर तब्बल १५ महिन्यांनी बाधितांच्या पुनर्वसन वसाहत कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुंबईतील सिध्दिविनायक ट्रस्टने मंजूर केलेल्या एकूण ११ कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम २४ घरे बांधण्यात येत आहेत. यासाठी काढलेल्या घर बांधणीच्या दोन्ही निविदांची कामे राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांच्या कंपनीला मिळाली आहेत. सद्यस्थितीत अलोरे येथे बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली जागा साफसफाईला सुरुवात झाली आहे.
गतवर्षी २ जुलैच्या रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर उडालेल्या हाहाकारात अपरिमित आर्थिक व जीवितहानी झाली. तब्बल २२ जणांचे बळी गेले आणि ४५ कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाली. या कुटुंबियांना आर्थिक स्वरूपाची मदत झाली असून, काही महिन्यांपूर्वी येथील वाहून गेलेली जॅकवेल पुन्हा उभारून पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे.
त्यानंतर आता पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे. पुनर्वसन, रस्ते, पूल, साकवांसह धरण पुनर्बांधणी याची कार्यवाही सुरु केली आहे. यामध्ये मुख्यत: बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत.
प्रथमत: एक मॉडेल घर तयार करण्यात येणार आहे. तपासणीनंतर उर्वरित घरांच्या कामांना सुरुवात होणार आहे. अलोरे येथे कोयना प्रकल्पाची वसाहत पडून असल्याने तेथे १.६० हेक्टर जागेवर पुनर्वसन करण्यात येत आहे. पाणी, वीज, बाजारपेठ, शाळांसह सर्व सोयी सुविधांनी युक्त ही जागा महत्वाची आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ३ कोटी ८० लाख रुपये खर्चाच्या २४ घरांसाठीच्या २ निविदा काढल्या होत्या. या दोन्ही निविदांची कामे राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली आहेत. तूर्तास २४ घरांचा प्रश्न सुटला आहे. एकूण ४० कुटुंबाचे पुनर्वसन होणार असल्याने व त्यातच काहीजणांना गावातच राहायचे असल्याने त्यांच्या जागेचा शोध सुरू आहे.