वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडणार, १५ दिवसात मोहीम सुरू होणार
By मनोज मुळ्ये | Published: February 14, 2024 06:08 PM2024-02-14T18:08:26+5:302024-02-14T18:09:49+5:30
वानरे, माकडांमुळे दरवर्षी शेती, बागायतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
पावस : शेतीबागायतीसाठी उपद्रव ठरत असलेली वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्याच्या योजनेसाठी निधी मंजूर झाला असून, येत्या पंधरा दिवसात या कामाला गोळपमधून सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती शेतकरी अविनाश काळे यांनी दिली.
रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील अविनाश काळे यांनी वानरे, माकडांच्या उपद्रवाबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. त्यासाठी उपोषणही केले आहे. पंतप्रधान सडक योजनेच्या रस्ता भूमिपूजन कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत आलेले असताना काळे यांनी त्यांची भेट घेतली. वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव वनविभागाने दिला असल्याचे मंत्री सामंत यांनी त्यांना सांगितले. प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी तालुक्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजनमधून मंजूर केला असल्याचे आणि गोळपमधूनच काम सुरू होणार असल्याचे मंत्री सामंत यांनी त्यांना सांगितले. रत्नागिरी तालुक्याचा खर्च पाहून उर्वरित तालुक्यांसाठी निधी देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
सातत्याने उठवला आवाज
वानरे, माकडांमुळे दरवर्षी शेती, बागायतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. माकडे फळांची नासधूस करत असल्याने अनेक बागायतदथारांनी केवळ याच कारणामुळे बागायत सोडली आहे. त्यामुळे काळे यांनी सातत्याने याबाबत आवाज उठवला आहे. उपाय करा नाहीतर आत्महत्या करायला परवानगी द्या, असे आंदोलनही त्यांनी केले आहे. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.