जिल्ह्यात पावसाने उडवली दाणादाण
By Admin | Published: June 12, 2017 01:19 AM2017-06-12T01:19:00+5:302017-06-12T01:19:00+5:30
रस्ते जलमय : अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना
रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हावासीयांची दाणादाण उडवली आहे. पावसाच्या दणक्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेकठिकाणी झाडे मोडून रस्त्यावर पडल्याने वाहतूक खोळंबली आहे. वादळी वाऱ्याने काही गोठ्यांचेही नुकसान झाले. चिपळूण-मिरजोळी ग्रामपंचायत कार्यालयाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात कागदपत्रे जळून खाक झाली. रत्नागिरीसह अनेक शहरांमधील रस्ते जलमय झाले असून, येत्या आठवडाभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात १ जूनआधीच मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनचे आगमन झाले आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर अधिक होता. १ जून ते ११ जून या कालावधीत जिल्ह्यात २१२४.६० तर सरासरी २३६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीहून अधिक आहे.
मंडणगड तालुक्यातील केळवद घाट रस्त्यावर १० जून रोजी दुपारी ३.२० वाजता झाड कोसळले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे झाड रस्त्यावरून हटवत मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. दापोली येथील मोरेश्वर दाबके यांच्या गोठ्याचे वादळी वाऱ्याने अंशत: २२ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यातील शिवरेवाडी येथील उदय दाते यांच्या घरावर वडाचे झाड कोसळून घराचे अंशत: नुकसान झाले. रविवारी या नुकसानाची आमदार उदय सामंत यांनी पाहणी केली. दाते यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे तातडीने करण्याची सूचना आमदारांनी यावेळी केली.