जिल्ह्यात महिनाभरात १,१७६ बालके कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:38+5:302021-07-04T04:21:38+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच जिल्ह्यात मे महिन्यामध्ये १,१७६ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बालके ...
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाच जिल्ह्यात मे महिन्यामध्ये १,१७६ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बालके १४ वर्षे वयोगटापर्यंत आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ४,०८४ बालके बाधित झाली आहेत. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात बालके बाधित हाेत असल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मार्चपासून सुरू झाली. मात्र, या दुसऱ्या लाटेत एप्रिल, मे आणि जून या महिन्यांमध्ये बाधित रुग्णांची संख्या जास्त होती. एप्रिलमध्ये ११,२५४ बाधित, २८० मृत्यू , मेमध्ये १४,१५६ बाधित, ५८३ मृत्यू तर जून महिन्यात बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्यांची संख्या १७,२०६ तर ५२४ बाधितांचा मृत्यू होता. त्यामुळे सर्वात जास्त रुग्ण जून महिन्यात आहेत.
इतर वयोगटातील नागरिकांचा बाधितांपेक्षा बालकांचे प्रमाण कमी असले तरी बालकांना उपचारादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच त्यांच्यावर प्रौढांप्रमाणे उपचार करता येत नाहीत. त्यामुळे बालरोगतज्ज्ञ अधिक लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही आजाराच्या उपचारामध्ये प्रौढ आणि बालकांचा प्रोटोकॉल वेगवेगळा असतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून बालकांची विशेष काळजी घेतली जात आहे.
-----------------------------
डेल्टा व्हेरिएंटची तिघांना लागण
मागील तीन महिन्यात सर्वाधिक बालके कोरोनाबाधित झाली. जिल्ह्यात सापडलेल्या डेल्टा व्हेरिएंटच्या ९ रुग्णांपैकी ३ बालकांचा समावेश होता. ही बालके बरी होऊन रुग्णालयातून घरी परतली आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक लक्ष देऊन आहे.
------------------------------------
बालकांसाठी काेविड रुग्णालय सज्ज
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त प्रमाणात बाधा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने आरोग्य यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून आतापासून तयारी केली आहे. शहरात जिल्हा क्रीडा संकुलात बालकांसाठी कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक बेड, ऑक्सिजन बेड, लहान मुलांचे आयसीयू तसेच व्हेंटिलेटर बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.
-----------------------------------
१४ वर्षांपर्यंतची बाधित एकूण बालके - ४,०८४
बालकांचे बाधित होण्याचे प्रमाण - ६.४४
१४ वर्षांनंतर एकूण बाधित रुग्ण- ५९,३१३
त्यांचे एकूण प्रमाण- ९३.५६
आतापर्यंतचे एकूण रुग्ण- ६३,३९७