लांजा तालुक्यात यंदा महिनाभर आधी पाणीटंचाई
By admin | Published: March 27, 2016 01:07 AM2016-03-27T01:07:10+5:302016-03-27T01:07:10+5:30
पाण्यासाठी वणवण : सहा वाड्यात भीषण परिस्थिती
रत्नागिरी : लांजा तालुक्याला गतवर्षीपेक्षा यंदा महिनाभर आधी पाणीटंचाई भेडसावू लागल्याने येथे येत्या काही दिवसांत पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच जिल्ह्यातील सहा गावांमधील सहा वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी खेड तालुक्यातील खवटी येथील धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. यंदा या तालुक्यामध्ये मार्च महिन्याच्या पंधरवड्यानंतर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गतवर्षीपेक्षा आठवडाभर आधीच या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागल्याने यंदा या तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
लांजा तालुक्यातील पालू गावातील चिंचुर्टी धावडेवाडीत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. याच वाडीमध्ये यावर्षीचा जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणारा पहिला टँकर मागील आठवड्यामध्ये पोहचला. आज पाणीटंचाईची स्थिती पाहता आठवडाभराच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यांत पाच गावांमधील पाच वाड्यांची संख्या वाढली असून, एकूण सहा गावांमधील सहा वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. यामध्ये दोन तालुक्यांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
या सर्व टंचाईग्रस्त वाड्या उंचावर आहेत. या टंचाईग्रस्त वाड्यांना शासनाकडून केवळ दोन टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी तो अपुरा आहे. केवळ पिण्याच्या पाण्याची सोय होत आहे. त्यामुळे येथील जनावरांची पाण्यासाठी तडफड सुरू आहे. (शहर वार्ताहर)
टॅँकरने पाणीपुरवठा
गतवर्षीच्या पाणीटंचाईमध्ये लांजा तालुक्यामध्ये ११ एप्रिलपासून पहिल्या टँकरने पाणीपुरवठा केला होता; मात्र यंदा महिनाभर आधीच या तालुक्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने येथील जनतेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत लांजा तालुक्यातील पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
टंचाईग्रस्त गावे
खेड तालुका : तुळशी खुर्द कुपजई, धनगरवाडी, खवटी, वरची धनगरवाडी, चिंचवली, ढेबेवाडी, आंबवली, भिंगारा धनगरवाडी
लांजा तालुका : पालू, चिंचुर्टी धावडेवाडी, कोचरी, भोजवाडी