मोन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:21 AM2021-06-28T04:21:42+5:302021-06-28T04:21:42+5:30
त्यावेळी मनात सहज विचार आला होता की खरंच हा वाचत असेल की, फक्त पाहत राहत असेल अशा पेपरच्या तुकड्याकडे..! ...
त्यावेळी मनात सहज विचार आला होता की खरंच हा वाचत असेल की, फक्त पाहत राहत असेल अशा पेपरच्या तुकड्याकडे..! तो पेपरचा तुकडा पाहताना त्याच्या मनात काय भाव असतील, डोळ्यात पाहिलं तर हा वेडाही वाटत नाही, असे अनेक प्रश्न मनात असायचे. हळूहळू या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. त्यातले तथ्य फक्त त्या मोन्यालाच माहीत कारण तो कधी बोललाच नाही, फक्त उत्तरे दिली ती राजापूरने !
वाढलेले केस, अंगावर बऱ्याचदा एकच शर्ट, हाफ पॅन्ट असा पेहराव असणारा हा नेहमीच अंतर्मनाला साद घालायचा. मला आठवतं, हा मोन्या बऱ्याचदा चप्पल दुरुस्त करत असायचा, एक-दोनवेळा मीही त्याच्याकडे एक कुतूहल म्हणून चप्पल दुरुस्तीला टाकली होती. फक्त खुणेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा, त्याला पैसे विचारले की तो हातवारे करुन सांगायचा. कामात खूप प्रामाणिक आणि कष्ट करुन खायची सवय. मी काहीवेळा त्याला पुस्तके विकतानाही पाहिलंय. त्याच्या चप्पलच्या दुकानासमोर बऱ्याचदा छोटी-छोटी पुस्तके विकायला लावलेली असायची. सलाम अशा व्यक्तीला आणि तिच्या विचारांना.
जो माणूस चप्पल दुकानात पुस्तके विकण्याचा विचार करतो म्हणजे त्याचे अंर्तज्ञान प्रगल्भ असणार, हे निश्चित. फक्त मोनेपणामुळे ते व्यक्त झाले नाही. समाजातील वैचारिक दारिद्र्य नष्ट व्हावे, याच शुध्द हेतूने मोन्या चप्पलच्या दुकानात पुस्तके विकण्याचे धाडस करत असावा कदाचित ! त्याला बोलता येत नसेल पण त्याची कृती समाजाचे प्रबोधन करणारीच आहे. मोन्याला वृत्तपत्र वाचनाची खूप आवड, रिकामा वेळ तो पेपर वाचनात घालवायचा. तर त्याला मुक्या प्राण्यांचीही फार आवड असल्याचे कायम निदर्शनास यायचे. कदाचित स्वतःच्या मुकेपणामुळेच त्याला मुक्या प्राण्यांची भाषा कळत असावी, असा माझा कयास आहे.
नाव जरी चंदू असलं तरी अख्ख्या राजापूरचा तो मोन्या ! वाढलेले केस व दाढी, अंगात हाफ शर्ट, हाफ पॅन्ट, पायात चप्पल असा ओबडधोबड पेहराव असला तरी त्याचे डोळे मात्र नक्कीच बोलके आणि तेजस्वी होते. सकाळी मी चालायला जायचो, तेव्हा हा मोन्या उन्हाळ्यावरुन आंघोळ करून चालत यायचा. राजापूर शहरात आलेला हा मोन्या आयुष्यभर एकाकी जीवन जगला पण त्याच्या अचानक निधनाची बातमी राजापूरकरांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करुन गेली. कारण आज दिवसभर राजापूर शहरात सोशल मीडियावर मोन्याला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येत होती. मग आपण आता तरी कसं म्हणणार की मोन्या एकाकी जीवन जगला !
अशा अनेक व्यक्ती राजापुरात होऊन गेल्या, त्यांना राजापूरकर कधीच विसरणार नाहीत, त्यातलाच हा एक मोन्या !
- विनोद पवार, राजापूर