ST Strike: ओबीसी संघर्ष समितीचा मोर्चा, अन् पाेलिसांनी दाखल केला चक्क दिवंगत शामराव पेजे यांच्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 12:27 PM2022-02-19T12:27:50+5:302022-02-19T12:28:09+5:30
या प्रकारामुळे रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समिती आक्रमक
रत्नागिरी : एसटी बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी ओबीसी संघर्ष समितीने काढलेल्या मोर्चानंतर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात ९९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, त्यात ९० क्रमाकांवर चक्क लोकनेते, माजी खासदार स्व. शामराव पेजे यांच्या नावाचा समावेश झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत संघर्ष समितीने प्रसिद्धी पत्रकातून आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत प्रशासन प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दिवंगत लोकनेते शामराव पेजे हे कुणबी समाजासह संपूर्ण रत्नागिरीवासीयांचे एक आदर्श नेते होते. आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
गुरुवार, दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समितीने एसटी सुरु करण्यासाठी माेर्चा काढला हाेता. पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. एफआयआरमध्ये तब्बल ९९ जणांची नवे पोलिसांनी नमूद केली असून त्यांच्यावर भादंविक १४१, १४३, १४९, २६९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चा ११० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ९९ संशयितांमध्ये समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते, उपाध्यक्ष राजीव किर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यामध्येच लोकनेते शामराव पेजे यांचेही नाव समाविष्ट केल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शास आले. या प्रकारामुळे रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.
याबाबतचे लेखी म्हणणे समितीच्यावतीने मांडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी एसटी पुन्हा सुरु करा या विधायक कामासाठी समिती एकत्र आली. पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल करून आमचा न्याय मागण्याचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न तर केलाच परंतु, आम्ही ज्यांना दैवत मानले आहे. त्या आमच्या दिवंगत नेत्यांचाही अपमान केला आहे, असे समितीचे म्हणणे आहे.
कुणबी आणि ओबीसी समाजाचे दैवत लोकनेते स्व. शामराव पेजे यांच्यावर ९० नंबर चे आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. ही अक्षम्य गंभीर चूक करणाऱ्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नंदकुमार मोहिते, साक्षी रावणांग, राजीव यशवंत कीर, दीपक राऊत यांनी केली आहे.