राजापुरात ६० हून अधिक अश्मयुगीन कातळशिल्पे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:38 PM2020-12-23T17:38:27+5:302020-12-23T17:40:17+5:30
Paleolithic carvings in Rajapur- सडा म्हणजे रखरखीत भूप्रदेश. मात्र, कोकणातील काही सडे परिसराचे अर्थकारण बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जांभा खडकांचे कातळ सडे हे दक्षिण कोकणाचे खास वैशिष्ट्य आहे. या सड्यांपैकी स्वत:चे वेगळेपण जपणाऱ्या राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, देवाचे गोठणे, सोलगाव परिसरातील सड्यांवर ६० हून अश्मयुगीन मानवनिर्मित कातळ खोद चित्ररूपी खजिना पर्यटकांना खुणावत आहेत.
रत्नागिरी : सडा म्हणजे रखरखीत भूप्रदेश. मात्र, कोकणातील काही सडे परिसराचे अर्थकारण बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जांभा खडकांचे कातळ सडे हे दक्षिण कोकणाचे खास वैशिष्ट्य आहे. या सड्यांपैकी स्वत:चे वेगळेपण जपणाऱ्या राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, देवाचे गोठणे, सोलगाव परिसरातील सड्यांवर ६० हून अश्मयुगीन मानवनिर्मित कातळ खोद चित्ररूपी खजिना पर्यटकांना खुणावत आहेत.
राजापूर तालुक्यातील कातळ सडा हा निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच आहे. या कातळाची जाडी २५ मीटरपेक्षा जास्त असून, भूजल साठेही खूप खोल आहेत. दक्षिणेकडे राजापूर, पन्हाळे, गोवळ तर नैऋत्य, वायव्येस देवाचे गोठणे, उत्तर दिशेस सोलगाव ही गावे या सड्याच्या कुशीत वसलेली आहेत. देवाचे गोठणेच्या सड्यावर ह्यचुंबकीय विस्थापनह्ण या निसर्ग नवलाची अनुभूती येते. पाचशे चौरस मीटर परिसरात होकायंत्रातील चुंबकसुई चुकीचे दिशादर्शन करीत आहे. द्वितीयक जांभा दगडात चुंबकीय विस्थापन दर्शविणारी ही जगातील एकमेव जागा आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठे कातळशिल्प
बारसू - पन्हाळे भागात ६० पेक्षा अधिक चित्र रचना आहेत. या भागातील तारवाच्या सड्यावर आशिया खंडात आढळून येणाऱ्या सर्वात मोठ्या खोद चित्र रचनांपैकी एक चित्ररचना आहे. तब्बल ५७ फूट लांब व १४ फूट रूंदीच्या या रचनेसोबत विविध आकृत्यांचा समूह आहे. याच भागात काही भौमितिक रचना आहेत. गोवळ परिसरातील सड्यावर ४५ पेक्षा अधिक चित्र रचनांचा आहेत. त्यात प्राणी, पक्षी, भौमितिक रचना आहेत.
प्राण्यांची कातळशिल्पे
सोगमवाडी - सोलगाव या गावांच्या सड्यावरील चित्र रचनांमध्ये मोठ्या आकाराच्या प्राण्यांची चित्रे आहेत. या चित्र रचनांमधील गवा, हत्ती, एक शिंगी गेंडा या प्राण्यांची चित्रे असून, दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ३०पेक्षा अधिक खोद चित्र रचना आहेत.
आढळले जीवाष्मही
देवाचे गोठणे सड्यावर दहापेक्षा अधिक रचना आहेत. त्यात काही मनुष्याकृती कोरलेल्या आहेत. सड्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले जीवाष्मही आढळले आहेत.
अश्मयुगीन मानवनिर्मित कातळ खोद चित्रे आढळलेले सडे पर्यटकांंना आकर्षित करणारे आहेत. याठिकाणी कृषी पर्यटन, होम स्टे, तंबू निवास यासारख्या व्यवस्था निर्माण करता येऊ शकतात. याठिकाणी स्थानिक कला, खाद्य संस्कृती यांना चालना मिळेल. यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पध्दतीने रोजगार निर्मिती होऊ शकते.
- सुधीर रिसबूड,
कातळखोद शिल्प शोधकर्ते