खेडमध्ये पुरामुळे ९५ हून अधिक नळपाणी योजना गाळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:05+5:302021-08-02T04:12:05+5:30
खेड : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ९५ पेक्षा अधिक नळपाणी योजनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या तडाख्यात अनेक नळपाणी योजना ...
खेड : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ९५ पेक्षा अधिक नळपाणी योजनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या तडाख्यात अनेक नळपाणी योजना वाहून गेल्या, काही गाळामध्ये रुतल्यात, तर अनेक ठिकाणचे पंपहाऊस बिघडल्याचे समोर येत आहे. खेड तालुक्यात ४ कोटी रुपयांचे नुकसान नळपाणी योजनांचे झाल्याचा अंदाज आहे.
गेल्या आठवड्यात ढगफुटीप्रमाणे कोसळलेल्या पावसामुळे खेडमध्ये जगबुडी आणि नारंगी नदीला पूर येऊन अतोनात नुकसान झाले. एका बाजूला पुरामुळे व्यापाऱ्यांच्या, लोकांच्या घरात, दुकानात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला गावा-गावात असणाऱ्या नळपाणी योजना खराब झाल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील ९५ नळपाणी योजना नादुरुस्त झाल्या असून, काही योजनांचे नदीकिनारी असलेले पंप हाऊस वाहून गेले आहेत, तर अनेक नळपाणी योजना अजूनही गाळात रुतल्यामुळे त्याठिकाणी जाणेही अशक्य बनले आहे. खेडमध्ये नळपाणी योजनांचे तब्ब्ल ४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी तातडीने या सर्व नुकसान झालेल्या नळपाणी योजनांचे अहवाल मागवले आहेत. तत्काळ त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्या गावांमध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे, त्या गावांना शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. आतापर्यंत गेल्या आठवड्यापासून अतिवृष्टीमध्ये ९१ नळपाणी योजनांचा पंचनामा आणि माहिती समोर आली असून, हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता व्ही. पी. पवार यांनी सांगितले.