रेडिमेड मखरांना अधिक मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:35 AM2021-09-06T04:35:34+5:302021-09-06T04:35:34+5:30
रत्नागिरी : दीड ते अकरा दिवसांसाठी पाहुण्या येणाऱ्या बाप्पांच्या बैठकीसाठी खास आरास करण्यात येते. बाप्पांच्या बैठकीसाठी मखर ...
रत्नागिरी : दीड ते अकरा दिवसांसाठी पाहुण्या येणाऱ्या बाप्पांच्या बैठकीसाठी खास आरास करण्यात येते. बाप्पांच्या बैठकीसाठी मखर उभारणे व ते सुशोभित करणे ही गणेशोत्सवापूर्वीची मुख्य तयारी असते. थर्माकोलवर बंदी असल्याने पर्यायी कापडी, लाकडी, कागदी तयार मखरे बाजारात विक्रीसाठी आली आहेत. याशिवाय मखराला चोहोबाजूंनी रंगीबेरंगी पडदे, झालर, फुलांच्या, मोत्यांच्या माळांनी सुशोभित केले जाते. शिवाय भोवताली विद्युत रोषणाई करून आकर्षकता वाढविण्यात येते.
दीड दिवसांचा असो वा अकरा दिवसांचा, बाप्पा घरी येणार असल्याने त्याचे स्वागत, बैठक व्यवस्था, प्रसाद, उत्सव काळातील धार्मिक बाबी ते थेट विसर्जनापर्यंतची तयारी भाविक मनोभावे करतात. त्यामुळेच तर बाप्पा येण्यापूर्वी घरोघरी मखर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. नोकरदार, व्यावसायिकांना मखर तयार करणे शक्य नसल्याने तयार मखरांना मागणी आहे.
बाजारात कापडी, कागदी तसेच लाकडी फोल्डिंगची मखरे आली आहेत. विविध आकारातील बैठक प्रकारांत सिंहासन, मयूरासन, पतंगासन याशिवाय मंदिरांमध्ये गोल मंदिर तसेच मोदक आकारातील मखरे उपलब्ध आहेत. इकोफ्रेंडली मखरांना सर्वाधिक मागणी आहे. ३५० रूपयांपासून बारा हजार रूपये किमतीची मखरे आकर्षक डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. आकर्षक रंगसंगतीमध्ये सजवलेल्या मखरांची विक्री सुरू आहे. याशिवाय मखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या कागदी, पुठ्ठ्यांच्या शीट्स, खांब, घुमट, घंटा झुंबर, छत्र्याही विक्रीसाठी आल्या आहेत.
नोकरदार, व्यावसायिक मंडळींना कामाच्या व्याप्तीमुळे तयारी करणे शक्य होत नसल्याने त्यांच्याकडून तयार मखरांची खरेदी केली जाते. मात्र, ग्रामीण भागात तर आजही कोऱ्या चादरी किंवा पडदे लावून मखर तयार करण्यात येते. त्यासाठी लागणारे पडदे, झालरी विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहेत. ४०० रूपयांपासून ग्राहकांना परवडतील, अशा किमतीत पडदे, दारावरची तोरणे, झालरी उपलब्ध आहेत. गणपतीसाठी शेला, फेटा, पितांबर, पूजेसाठी सोवळे विक्रीसाठी आले आहे. चोखंदळ ग्राहक बाजारात फिरून विविध वस्तूंची पारखून खरेदी करत आहेत. शासनाने निर्बंध शिथिल केले असल्याने बाजारातून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. शनिवारी, रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने खरेदीसाठी खास वेळ देण्यात येत आहे. गणेशोत्सवामुळे रविवारी सुट्टी दिवशीही बाजारपेठ सुरु ठेवण्यात आली आहे.