राजापुरातील पन्नासपेक्षा अधिक ग्रामपंचायतींचे रिफायनरीला समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:38 AM2021-09-07T04:38:38+5:302021-09-07T04:38:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : रिफायनरी प्रकल्पामध्ये राजापूर व देवगड तालुक्यांमधील तब्बल ४,०७४ युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत. राजापूर ...

More than fifty Gram Panchayats in Rajapur support the refinery | राजापुरातील पन्नासपेक्षा अधिक ग्रामपंचायतींचे रिफायनरीला समर्थन

राजापुरातील पन्नासपेक्षा अधिक ग्रामपंचायतींचे रिफायनरीला समर्थन

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : रिफायनरी प्रकल्पामध्ये राजापूर व देवगड तालुक्यांमधील तब्बल ४,०७४ युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत. राजापूर तालुक्यातील १०१पैकी तब्बल निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, यासाठी समर्थनपत्रे दिली आहेत. हे प्रकल्पाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाचे द्योतक आहे. आता शासन कोणता निर्णय घेते, यावर जसे प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे तसे ते तालुक्यात सक्रिय असलेल्या राजकीय पक्षांचेही आहे, अशी भूमिका रिफायनरी प्रकल्प समर्थक असलेल्या तीन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

त्यांनी म्हटले आहे की, प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी गेल्या पाच वर्षांत किती पर्यावरणपूरक उपक्रम आणले? कोणत्या पर्यटनपूरक योजना राबविल्या व कोकणात किती रोजगार निर्माण केला? पर्यावरणाची काळजी वाहणाऱ्या प्रकल्पविरोधकांनी मागील तीन ते पाच वर्षांत कोकणात किती वृक्ष लावले? अथवा पर्यावरण रक्षणाचे कोणते उपक्रम राबवले? फिनोलेक्स, जिंदल, अणुऊर्जा प्रकल्पासारख्या प्रकल्पांचे विरोधक तेथील जमीन अधिग्रहण पूर्ण झाल्यावर तिथली आंदोलने गुंडाळून रिफायनरी, आयलॉग जेटीविरोधी आंदोलनात का उतरले, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

रिफायनरी प्रकल्पांतर्गत नोकरी मिळण्यासाठी राजापूर व देवगड तालुक्यांमधील तब्बल ४,०७४ युवकांनी नोकरीसाठी अर्ज केलेले आहेत. ही संख्या दररोज वाढत आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी फुटकळ विरोधक घेणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. बारसू-सोलगाव भागात अजिबात विस्थापन नसताना व विस्तीर्ण कातळावर प्रकल्पासाठी पर्याय पुढे आलेला असताना ग्रामस्थांची घरे उठणार आहेत, हा जावईशोध कोणत्या लाकूडतोड प्रकल्प विरोधकाने लावला त्याने पुढे येऊन तालुक्याला सांगावे, असे आव्हानही या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

-----------------------------

विराेधकांना आव्हान

रिफायनरीमुळे सर्व परिसरात प्रदूषण होते, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर भारतात एकूण २३ रिफायनरी आहेत मग त्यांच्या नजीकच्या शहरांची नावे भारतातील प्रदूषित शहरांच्या यादीत का नाहीत? रिफायनरीमुळे मच्छीमारी संकटात सापडते, असे सांगितले जात आहे. मग भारतातील सर्व प्रमुख मच्छिमारी केंद्रे रिफायनरी असलेल्या बंदरातच कशी? रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे आंब्याच्या पिकाची अपरिमित हानी होईल, असे म्हणणाऱ्या विरोधकांनी जामनगर रिफायनरीच्या क्षेत्रात कोकणाच्या चारपट जास्त आंब्याचे उत्पादन कसे घेतले जाते, याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.

Web Title: More than fifty Gram Panchayats in Rajapur support the refinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.