वर्षभरातील रुग्णांपेक्षा एप्रिलमधील रुग्ण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:35+5:302021-05-03T04:25:35+5:30
रत्नागिरी : गेल्या वर्षभरात काेराेनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच एप्रिल २०२१ महिना जिल्हावासियांच्या चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. वर्षभरात ...
रत्नागिरी : गेल्या वर्षभरात काेराेनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच एप्रिल २०२१ महिना जिल्हावासियांच्या चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. वर्षभरात आढळलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळले आहेत. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ११,०२९ रुग्ण आढळले हाेते, तर एप्रिल २०२१ या केवळ एका महिन्यात ११,२५४ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २२,२८३ इतकी झाली झाली.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच जनतेसाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले. तरीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी काळजी न घेतल्याने एप्रिल महिन्यात जास्त प्रमाणात कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात महिनाभरात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग राखत मास्कचा वापर करावा. लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. तसेच कोराेनाची चाचणीही घेण्यात येत आहे. तरीही नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२,२८३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, तर आतापर्यंत एकूण ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महिनाभरातील आकडेवारीकडे पाहिले असता, जिल्ह्यात ११,२५४ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १४,८६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी साेडण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.
पोलीस यंत्रणेकडून गावे दत्तक
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आता पोलीस यंत्रणेकडून गावे दत्तक घेण्यात आली आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढ असल्याने पोलिसांकडून या दत्तक घेण्यात आलेल्या गावांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या गावातील लाेकांचे ऑक्सिजन व तापमान तपासण्यात येणार आहे.
लसीकरण मोहीम जोरात
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा मृत्यू दर कमी हाेण्यास मदत हाेणार आहे. लसीमुळे लोकांच्या प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होऊन रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी होतील.