चीनच्या सीमेपेक्षा अधिक पोलिस बारसूत, खासदार विनायक राऊतांची सरकारवर टीका
By मनोज मुळ्ये | Published: April 26, 2023 03:18 PM2023-04-26T15:18:36+5:302023-04-26T15:19:03+5:30
शिंदे सरकार दडपशाहीने रिफायनरी प्रकल्प रेटून नेण्याचे काम करत असल्याचा केला आरोप
राजापूर : चीनच्या सीमेवर नाहीत, इतक्या पोलिसांची छावणी भूमिपुत्रांचा आवाज दाबण्यासाठी बारसूमध्ये तैनात करण्यात आली आहे आणि दमनशाहीने रिफायनरी प्रकल्प रेटून नेण्याचे काम शिंदे सरकार करत आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला.
बुधवारी त्यांनी बारसू येथे जमलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि स्थानिक पोलिसांवर कडाडून टीका केली. पोलिसी बळावर भूमिपुत्रांचा आवाज दाबून टाकायचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
भेटीसाठी वेळ मागणाऱ्या रिफायनरी विरोधी संघटनेच्या निवेदनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनी केराची टोपली दाखवली असल्याचेही ते म्हणाले. २०२१ साली उदय सामंत यांनी रिफायनरीला विरोध केला होता. आता तेच यासाठी पुढाकार घेत आहेत. मोठे प्रकल्प ते गुजरातला पाठवतात, असा आरोपही त्यांनी केला. २०२४ नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येईल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.