चिपळुणात पाच किलोहून अधिक गांजा जप्त, सावर्डेतील महिला ताब्यात
By संदीप बांद्रे | Published: June 1, 2024 04:37 PM2024-06-01T16:37:38+5:302024-06-01T16:38:10+5:30
चिपळूण : शहर व परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे रॅकेटच पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. खेर्डी बाजारपेठेतील टपरी विक्रेत्या ...
चिपळूण : शहर व परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे रॅकेटच पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. खेर्डी बाजारपेठेतील टपरी विक्रेत्या कडून गांजाच्या ११ पुड्या जप्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी सावर्डे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेत तिच्या घरातून पाच किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. मीनाक्षी बाळू जयस्वाल (वय ५१, सावर्डे बाजारपेठ, जिल्हा परिषद, मराठी शाळे ) असे ताब्यात घेतलेले महिलेचे नाव आहे.
त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी मोहीम येथील पोलिसांनी आणखी तीव्र केली असून या प्रकरणाच्या मुळाशी पोहचण्याचा प्रयत्न येथील पोलीस यंत्रणेने सुरु केला आहे. या मोहिमेमुळे गांजा विक्रेत्यांसह अंमली पदार्थ विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहेत.
खेर्डी माळेवाडी येथील रहिवासी असलेला साईराज कदम याच्या चौकशीत गांजाच्या ५० ग्रॅम वजनाच्या ११ पुड्या शुक्रवारी आढळून आल्या. सुमारे २२०० रूपये किमतीचा हा गांजा जप्त केला. त्यापाठोपाठ सावर्डे पोलिसांनाही मीनाक्षी जयस्वाल हिच्या विषयी गोपनीय माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे सावर्डे पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शनिवारी सकाळी सापळा रचून मीनाक्षी जयस्वाल हिला ताब्यात घेतले. तसेच तिच्या घराची झडती घेतल्या नंतर तेथे पाच किलो पेक्षा अधिक गांजा आढळून आला.
चिपळूण शहरात अजूनही पारंपरिक पध्दतीने गांजा विक्रीचा व्यवसाय केला जातो. या व्यवसायात आता काही महिलाही पुढे आल्या आहेत. गतवर्षी पकडलेल्या चार मुलांनी शहरातील पाग भागातील एका बॉडी बिल्डरला ताब्यात घेतले होते. त्याचवेळी गांजा विक्रीमध्ये एक दोन महिलाही सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याही तरुणांना अमिष दाखवून गांजाचा पुरवठा करत होत्या.
फरशीतिठा परीसरातील एक महिला शहरातील गोवळकोट परिसरात गांजा पुरवठा करत असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली होती. मात्र आता सावर्डे येथे महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे तात्काळ सावर्डे पोलिसांनी कारवाई करून मीनाक्षी जयस्वाल हिला ताब्यात घेत गांजा जप्त केला आहे. सावर्डे पोलिसांची ही कारवाई उशिरा पर्यंत सुरु होती.