पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात तीन लाखांपेक्षा जास्त नुकसान
By admin | Published: June 30, 2017 03:40 PM2017-06-30T15:40:48+5:302017-06-30T15:40:48+5:30
प्राथमिक अहवाल : झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी, दि. ३0 : जिल्ह्यात बुधवार (दि. २७) रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी घरे व गोठे यांचे सुमारे ३ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे अनेक घरांमध्ये पाणी भरल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि घरगुती वस्तुंचे एकूण २ लाख ६८ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सकाळी आंबा घाटासह अन्य ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक थांबली होती. मात्र, आता वाहतूक पूर्र्ववत सुरू झाली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात जोरदार बरसण्यास सुरूवात झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातही पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यातील साडेय येथील नरेश जाधव यांच्या घरावर झाड पडल्याने त्यांचे ४४०० रूपयांचे नुकसान झाले आहे.
आनंदी महादेव, परेश गुजराथी, संतोष धनावडे यांच्या घराचे अंशत: मिळून १६, ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील निर्मला जाधव यांचे पावसात घर पडल्याने नुकसान झाले. शिरगाव येथील सतीश चव्हाण यांच्या घरावर झाड पडून ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील घरांमध्ये पाणी भरल्याने इलेक्ट्रॉनिक्स तसेच घरगुती वस्तुंचे नुकसान झाले आहे. यात तुळशीदास टाक, भगवान जाधव, संजय कदम, वासंती भोसले, दिनानाथ कतार यांचा समावेश आहे. राजेंद्र भोजने यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यात कोंबड्या वाहून गेल्या असून, घराचेही २६,५०० रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शिवराम पावसकर, गजानन नाटेकर यांच्या घरावरील कौले उडाली आहेत.
आंबा घाटात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाड हटविण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे मुंबई - गोवा महामार्गावर आज सायंकाळी ५ वाजता झाड कोसळले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने ते हटवून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. गेल्या २४ तासात पावसामुळे जिल्ह्यात ३ लाख रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.