रावतळे येथील मोरीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:29 AM2021-05-17T04:29:52+5:302021-05-17T04:29:52+5:30
अडरे : चिपळूण शहरातील रावतळे येथे महामार्गालगत तलाठी यांच्या दुकानाजवळ मोरीचे काम आता सुरू करण्यात आले ...
अडरे : चिपळूण शहरातील रावतळे येथे महामार्गालगत तलाठी यांच्या दुकानाजवळ मोरीचे काम आता सुरू करण्यात आले असून, या मोरीमुळे पावसाळ्यात रावतळे भागात पाणी भरण्याची शक्यता आहे. कारण महामार्गाच्या गटराला जोडून हे मोरीचे पाईप टाकण्यात येत असल्याने पाण्याचा निचरा होणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. रावतळे येथील भाग कायम चर्चेत राहिला आहे. आता येथे सर्व्हिस रोडचे काम झाले आहे. तसेच नळपाणी योजनेची पाईपलाईनही टाकून झाली आहे. गटारांचे काम रस्त्याच्या दोन्ही बाजूपर्यंत पूर्ण आहे. मात्र, फाटक व भागवत यांच्या घराकडून येणाऱ्या मूळच्या गटाराचे पाणी जाणार कुठे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गटार बंद केले तर रावतळेत पाणी भरेल. त्यामुळे विंध्यवासिनी मंदिराकडे जाणाऱ्या रावतळे रोडच्या मोरीचे काम सुरू झाले आहे. हे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी ठेकेदार प्रयत्न करत आहेत. मोरीचे काम सुरू असल्याने रावतळे, धामणवणे ग्रामंस्थाना मते वाडीमार्गे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय झाली आहे. मोरीचे काम व्यवस्थित झाले नाही तर या भागात पाणी रस्त्यावर येऊन लगतच्या नागरिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.