रत्नागिरीत महिलांसाठी मशिदीचे दार उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:54 AM2019-02-04T06:54:52+5:302019-02-04T06:55:07+5:30
मुस्लीम धर्मातील पाच मुख्य तत्त्वांपैकी एक म्हणजे नमाज. पाच वेळचा नमाज सर्वांसाठी अनिवार्य आहे. महिलांना घरीच नमाज अदा करावा लागतो.
- मेहरून नाकाडे
रत्नागिरी - मुस्लीम धर्मातील पाच मुख्य तत्त्वांपैकी एक म्हणजे नमाज. पाच वेळचा नमाज सर्वांसाठी अनिवार्य आहे. महिलांना घरीच नमाज अदा करावा लागतो. पण या पारंपरिक प्रथेला छेद देत शहरातील सर्वात जुन्या १०० वर्षे पूर्ण केलेल्या परकार मशिदीने खास महिलांसाठी नमाजासाठी विशेष कक्ष उभारला आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.
५० महिलांना एकाचवेळी नमाज पढण्याची येथे सुविधा असून स्वतंत्र विश्राम कक्षही सुरू करण्यात आला आहे. संपूर्ण देशात महिलांसाठी मशिदीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात परकार मशीद कमिटीने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
जमातुल मुस्लिमीन रत्नागिरी बाजारपेठचे अध्यक्ष शकील मुर्तूझा, सचिव एजाज सुभेदार व सर्व कार्यकारिणीने महिलांसाठी मशिदीलगतच विशेष अद्यावत कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. येथे नमाजापूर्वी वजू करण्यासाठी वजूखाना उभारला आहे. एकाचवेळी सहा महिला वजू करू शकतात. त्यानंतर नमाज अदा केला जावू शकतो. बाहेरगावाहून येणाऱ्या महिलांना डबे खाण्यासाठीही सुविधा आहे.
मशिद भेटीतून देणार ‘भाईचाºयाची’ शिकवण
पुणे : बंधुभाव - भाईचारा फाऊंडेशनच्यावतीने मशीद भेटीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या माध्यमातून सर्वांना ‘भाईचाºयाची’ शिकवण येत्या शुक्रवारपासून देण्यात येणार आहे. फाउंडेशनचे सचिव यासीन शेख म्हणाले, नागरिकांच्या मनात मशिदीविषयक कुतुहलाबरोबरच अनेक स्वरुपाचे गैरसमज देखील आहेत. ते दूर करण्याकरिता या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. शहरातील महर्षीनगर व कौसरबाग येथील मशिदीला नागरिकांना भेट देता येणार आहे.