Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सुसाट; पण पावसाळ्यात धोका कायम
By संदीप बांद्रे | Published: May 4, 2024 03:57 PM2024-05-04T15:57:23+5:302024-05-04T15:57:33+5:30
धोकादायक दरडींच्या ठिकाणी उपाययोजना करण्याची आवश्यकता
संदीप बांद्रे
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे बहुतांशी काम पूर्णत्वास गेले आहे. आता घाटातून प्रवास करताना वाहनांचा वेगही वाढला आहे; मात्र अजूनही घाटातील दरड प्रणव क्षेत्रात धोका टळलेला नाही. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे कामही अजून अपूर्ण आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात घाटातील सुरक्षितता समाेर येणार आहे.
महामार्ग चौपदरीकरणात परशुराम घाटातील काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले. चौपदरीकरणातील जमिनीच्या मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा आजतागायत सुटलेला नाही. सुरुवातीला प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नव्हता; मात्र त्यानंतर अत्यंत घाईघाईने काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याचे परिणाम मागील वर्षी पहिल्याच पावसात दिसले. अनेक ठिकाणी काँक्रीटीकरणाचा भाग खचला हाेता. विशेषतः घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. त्या ठिकाणी नव्याने काँक्रीटीकरणाचे काही महिन्यांपूर्वीच पूर्ण केले.
या घाटातील अतिशय अवघड टप्पा चिपळूण हद्दीत, उर्वरित भाग महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हद्दीत येतो. महाड हद्दीत कल्याण टोलवेज कंपनीकडून सुरू असलेल्या कामावर अखेरचा हात फिरवला असला, तरी त्या ठिकाणी अजूनही किरकोळ स्वरूपाची कामे शिल्लक आहेत; मात्र चिपळूण हद्दीत काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असले, तरी या ठिकाणी दरडीची उंची अधिक असल्याने तेथे पायरी पद्धतीने रचना करण्याची मागणी केली जात आहे.
तूर्तास दरडीचा धोकाही कायम आहे; मात्र आता संबंधित कंपनीने चिपळुणातील यंत्रणा संगमेश्वर हद्दीतील कामात गुंतल्याने परशुराम घाटातील कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी काही महत्त्वाच्या उपाययोजना न केल्यास यावर्षीही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार आहे; तसेच पायथ्यालागतच्या घरांचाही धोका टळलेला नाही. आता दोन्ही मार्गांवर वाहतूक सुसाट सुरू झाली असली, तरी दरडीची उंची लक्षात घेता दोन्ही मार्गांवरील धोका टळल्याची खात्री अजून तरी ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेली नाही.
अजूनही महाड हद्दीत किरकोळ काम शिल्लक असून पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल; मात्र दरडीचे टप्पे तयार करण्यासाठी जागा अपुरी आहे. त्यामुळे काम थांबले आहे. मात्र, त्या ठिकाणची गटारातील माती व अन्य साफसफाई तातडीने केली जाणार आहे. - आर. पी. कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग