कोकण रेल्वे ठप्प... पेडणे बोगद्यात रुळावर चिखल; ठाणे, दिवा स्थानकांमध्ये प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 07:33 AM2024-07-11T07:33:47+5:302024-07-11T07:33:56+5:30

ज्या प्रवाशांना याबाबत माहिती नव्हती ते ठाणे, दिवा स्थानकांमध्ये ताटकळत गाड्यांची वाट पाहत होते.

Most of the trains going to Konkan were canceled on Wednesday | कोकण रेल्वे ठप्प... पेडणे बोगद्यात रुळावर चिखल; ठाणे, दिवा स्थानकांमध्ये प्रवाशांचे हाल

कोकण रेल्वे ठप्प... पेडणे बोगद्यात रुळावर चिखल; ठाणे, दिवा स्थानकांमध्ये प्रवाशांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली/पनवेल/रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यात चिखल व पावसाचे पाणी रेल्वे मार्गावर आल्याने बुधवारी कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाड्यांची वाहतूक रद्द करण्यात आली. ज्या प्रवाशांना याबाबत माहिती नव्हती ते ठाणे, दिवा स्थानकांमध्ये ताटकळत गाड्यांची वाट पाहत होते.

कोकणात जाणाऱ्या गाड्या रात्री उशिरा, पहाटे ठाणे स्थानकात येतात. सावंतवाडी, रत्नागिरीला जाण्यासाठी दिवा स्थानकात प्रवासी आले होते. मात्र, अचानक रेल्वे मार्गावर पाण्यासह चिखल आल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सकाळपासून रेल्वे आणि जिल्हाधिकारी ठाणे यांनी प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी गाड्या नसल्याचा संदेश दिला होता. समाजमाध्यमांवरही व्हायरल झाल्याने जनजागृती होण्यास मदत झाली. मात्र, ही माहिती काही प्रवाशांना मिळाली नाही. त्यामुळे ठाणे, दिवा स्थानकांमध्ये गाड्यांची वाट पाहताना अनेक प्रवासी दिसले.

'या' एक्स्प्रेसच्या मार्गात बदल

कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या अन्य मागनि वळविण्यात आल्या आहेत. एर्नाकुलम-एच. निजामुद्दीन एक्स्प्रेस थलास्सेरी येथून शोरानूर जंक्शनमार्गे वळविण्यात आली आहे.

तिरुअनंतपुरम सेंट्रल-लोकमान्य टिळक ( (टी) एक्स्प्रेस तिरुअनंतपुरम सेंट्रल येथून सायंकाळी ४:५५ वाजता सुटेल. ही रेल्वे शोरानूर जंक्शनमार्गे इरोड जं.- धर्मावरम - गुंटकल जंक्शन-रायचूर-वाडी-सोलापूर जं. - पुणे जं.-लोणावळा-पनवेल अशी वळविण्यात आली.
तर काही गाड्या रद्द केल्या आहेत. यात मडगाव जं. चंडीगड एक्स्प्रेस,

मंगळुरू सेंट्रल - लोकमान्य टिळक (टी), मंगळुरू जं. - मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस आणि सावंतवाडी रोड मडगाव जं. या रेल्वे रद्द करण्यात आल्या. 

मुंबई सीएसएमटी- मडगाव जं. असा प्रवास करणारी कोकणकन्या एक्स्प्रेस सावंतवाडी रोडपर्यंत जाऊन सावंतवाडी रोड - मडगाव जंक्शनदरम्यान प्रवास रद्द करण्यात आला. तसेच लोकमान्य टिळक (टी)- मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेसचाही प्रवास सावंतवाडी रोडपर्यंत समाप्त करण्यात आला.

... तर पुढे जाता आले असते

कोकणात पाऊस असतोच, पेडणे आधी सावंतवाडी स्थानक असल्याने त्या स्थानकापर्यंत गाड्या सोडता आल्या असत्या तर प्रवाशांची गैरसोय झाली नसती, असे काही प्रवाशांचे म्हणणे होते. ज्या स्थानकात जाणे सुरक्षित होते तेथपर्यंत गाड्या चालवून प्रवासी पुढे गेले असते, परंतु तसे न झाल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

पनवेल स्थानकात झळकले फलक

कोकण रेल्वेच्या गाड्या बंद झाल्याची माहिती पनवेलचे स्टेशन मास्तर जगदीश मीना यांना ६.१५ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर गाड्या रद्द झाल्याची माहिती प्रवाशांना मिळण्यासाठी पनवेल रेल्वेस्थानकात फलक लावण्यात आले.

अनेक गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे गाड्यांच्या माहितीसाठी ०८३२-२७०६४८० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा -सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

१३ एक्स्प्रेस गाड्या रद्द

नवी मुंबई: मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. धुवाधार पावसामुळे मंगळवारी पाडणे बोगद्यात पाणी आणि गाळ साचल्याने बुधवारी या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

१० जुलैला मुंबईहून सुटणाऱ्या १३ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच गोव्याहून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या गाड्याही रद्द करण्यात आल्याने सावंतवाडी स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाला. काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी उशिरापर्यंत पाडणे बोगद्यातील अडथळा दूर करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

१० जुलै रोजीच्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या

१२६१९ लोकमान्य टिळक टर्मिनल-मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेस
१०१०३ मुंबई सीएसएमटी-मडगाव जं. मांडोवी एक्स्प्रेस
१०१०४ मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस
५०१०८ मडगाव जं. सावंतवाडी रोड
२२१२० मडगाव जं.-मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस
१०१०६ सावंतवाडी रोड-दिवा
५०१०७ सावंतवाडी रोड-मडगाव
 

Web Title: Most of the trains going to Konkan were canceled on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.