रत्नागिरीत स्फोटात माय-लेक ठार, स्फोट नेमका कशाचा याबाबत गूढ; दहशतवादविरोधी पथकाकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 02:25 PM2023-01-19T14:25:35+5:302023-01-19T14:25:56+5:30
स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, घराच्या भिंतींचे दगड दुसऱ्या इमारतीवर जाऊन पडले, तर स्लॅब तुटून पडला
रत्नागिरी : शहराजवळील शेट्येनगर येथे एका घरात झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे इमारतीचा स्लॅब कोसळल्याने माय-लेकी ठार झाल्या, तर बाप-लेक जखमी झाले. कनिज अश्फाक काजी व नुरुन्निसा अलजी अशी मृतांची नावे आहेत. अश्फाक काजी व मुलगा अम्मार काजी हे गंभीर जखमी झाले आहेत.
घरातील गॅस गिझरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत असली तरी स्फोटामुळे बसलेला हादरा आणि त्याने आसपासच्या भागात झालेले नुकसान पाहता स्फोट नेमका कसला आहे, याबाबत गूढ निर्माण झाले आहे. कोल्हापूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळाचे नमुने घेण्यात आले आहेत. दहशतवादविरोधी पथकही रत्नागिरीत दाखल झाले आहे.
शेट्येनगर येथील एका चाळीत पहिल्या मजल्यावर अश्फाक काजी यांच्या घरात हा प्रकार घडला. काजी पहाटे ४:५५ वाजता उठले. त्यांनी विजेचे बटन सुरू करताच मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, घराच्या भिंतींचे दगड दुसऱ्या इमारतीवर जाऊन पडले, तर स्लॅब तुटून पडला. स्लॅब कोसळल्याने त्याखाली अश्फाक काजी यांची पत्नी कनिज व सासू नुरुन्निसा अलजी यांचा जागीच मृत्यू झाला.
स्फोटात अश्फाक स्वत: गंभीररीत्या भाजले असून, त्यांचा मुलगा अम्मार जखमी झाला आहे. दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अश्फाक जास्त भाजले असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
स्फोटाची माहिती मिळताच पोलिस तत्काळ शेट्येनगरमध्ये दाखल झाले. आसपासच्या नागरिकांनीच अश्फाक व अम्मारला बाहेर काढले. मात्र, स्लॅब अंगावर कोसळल्यामुळे कनिज व नुरुनिस्सा अडकल्या होत्या. क्रेनच्या साहाय्याने स्लॅबचे तुकडे बाजूला करण्यासाठी तब्बल दोन तासांचा अवधी लागला. त्यानंतर माय-लेकीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
सिलिंडर ‘जैसे थे’
पोलिसांनी स्फोट झालेल्या खोलीची पाहणी केली. त्यावेळी आतील सर्व गॅस सिलिंडर जैसे थे असल्याचे निदर्शनास आले. सिलिंडरमधून गळती झालेला गॅस पसरला होता. आपण विजेचे बटन सुरू करताच गॅसचा स्फोट झाला, असे जखमी अश्फाक काजी यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, घरातील सिलिंडर जसेच्या तसे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
स्फोट नेमका कशाचा?
या स्फोटामुळे घराच्या भिंती तुटल्या. काजी यांच्या घरासह बाजूच्या दोन खोल्यांचाही स्लॅब कोसळला. स्फोटाची ही तीव्रता पाहता तो सिलिंडरचाच स्फोट होता का, याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
हसता खेळता परिवार
अश्फाक काजी यांचा मोठा मुलगा इंजिनिअर असून, मुंबईत नोकरी करतो. धाकटा मुलगा अम्मार सध्या तंत्रनिकेतनमध्ये असून, त्याची परीक्षा सुरू आहे. पती, पत्नी, मुलगा आणि अश्फाक यांच्या सासू असा परिवार या घरात राहत होता. आता अम्मारच्या डोक्यावरील आई आणि आजीचे छत्र हरवले आहे. त्याचे वडील अश्फाक मृत्यूशी झुंज देत आहेत.
दहशतवादविरोधी पथक रत्नागिरीमध्ये दाखल
शेट्येनगरमध्ये झालेला स्फोट नेमका कशामुळे झाला आहे, याबाबत गूढ आहे. सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे इतक्या मोठ्या तीव्रतेने स्फोट होऊ शकतो का, असा प्रश्न निर्माण झाल्याने नवी मुंबई येथील दहशतवादविरोधी पथक रत्नागिरीत दाखल झाले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला आहे, याचा वेगवेगळ्या बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे.
रत्नागिरीतील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक लॅब) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपासणी केलीच. शिवाय कोल्हापूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांनी घटनास्थळाचे वेगवेगळे नमुने घेतले आहेत. त्यांचा अहवाल १५ दिवसांनंतर प्राप्त होणार आहे. त्यानंतरच हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे.